अहिल्यानगर जिल्ह्यात वीस एकरांवर श्रीराम सृष्टी ! एतिहासिक प्रकल्पाने सर्वांचे लक्ष वेधले!

Published on -

कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव तालुक्यातील चासनळी गावाला ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा लाभलेला आहे. असे मानले जाते की प्रभू श्रीराम वनवासाच्या काळात या ठिकाणी काही काळ वास्तव्याला होते. हा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी आणि भावी पिढ्यांना रामायणाच्या महान परंपरेची जाणीव करून देण्यासाठी गावकऱ्यांनी ‘श्रीराम सृष्टी’ उभारण्याचा निर्णय घेतला. या कल्पनेला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर संपूर्ण गावाने एकत्र येऊन या प्रकल्पासाठी योगदान दिले.

गावकऱ्यांचे श्रमदान

ग्रामपंचायतीने या पवित्र कार्यासाठी २० एकर जागा दान केली. मायभूमी फाउंडेशनच्या पुढाकाराने गावातील तरुणांनी दर रविवारी श्रमदान सुरू केले आणि दीड वर्षाच्या अथक परिश्रमांनंतर गोदाकाठ परिसर स्वच्छ करण्यात आला. लोकवर्गणीद्वारे २५ लाख रुपये जमा झाले. त्याचबरोबर राज्य सरकारनेही या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मदतीचा हात देत तब्बल अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. डिसेंबर २०२४ मध्ये या श्रीराम सृष्टीच्या उभारणीस अधिकृत सुरुवात झाली.

श्रीराम सृष्टीतील भव्य निर्मिती

ही भव्य सृष्टी २० एकर जागेवर उभारली जात असून येथे प्रभू श्रीराम यांचे १९ फूट उंच धनुर्धारी शिल्प आणि सुवर्णभूग (मारीच) शिल्प उभारण्यात येत आहे. पहिल्या टप्प्याचे उद्घाटन उज्जैनचे खासदार महंत उमेशनाथ महाराज आणि महंत शिवानंदगिरी महाराज यांच्या हस्ते झाले. या प्रकल्पात रामायणातील विविध प्रसंग ४२ शिल्प म्युरल पलेट स्वरूपात साकारले जात आहेत. या सृष्टीसाठी चार प्रमुख प्रवेशद्वार असतील – सत्ययुग द्वार, कलियुग द्वार, द्वापरयुग द्वार आणि वैकुंठद्वार. तसेच गोदातीरी शरयू घाट, यमुना घाट, गंगा घाट आणि कावेरी घाट असे चार प्रमुख घाट साकारले जात आहेत.

१ हजार १११ किलो वजनाची घंटा

श्रीराम सृष्टीत केवळ रामायणाच्या घटनांचे दर्शनच नाही, तर भारताच्या एकात्मतेचे प्रतीक असलेल्या १५ महान सम्राटांची म्युरल पलेट उभारली जाणार आहे. या सम्राटांसमोर १५१ फूट उंच भव्य ध्वज उभारला जाणार आहे. विशेष म्हणजे, तब्बल पाच किमीपर्यंत निनाद होईल अशी १ हजार १११ किलो वजनाची मोठी घंटा देखील येथे स्थापित केली जाणार आहे. याशिवाय, वेद, उपनिषदे आणि अरण्यके यांची माहिती देणारे डॉक्युमेंटरी प्रदर्शन केंद्र, दोन ध्यानधारणा केंद्र, गोदावरी नदीपात्रात ५१ फूट उंचीची शंकर-पार्वती मूर्ती, प्रवेशद्वारावर गोमातेची मूर्ती, तसेच दोन प्रमुख प्रवेशद्वारांवर गजलक्ष्मीची शिल्पे उभारली जात आहेत.

लेझर शोतुन रामायणाची कथा

या सृष्टीमध्ये एकूण १८ रस्ते असतील, त्यांना भारतीय संस्कृतीच्या १८ पुराणांची नावे दिली जाणार आहेत. येथे रोज रात्री लेझर शोच्या माध्यमातून रामायणाची कथा उलगडली जाणार आहे. तसेच रामायण रिसर्च सेंटर, मौलिक संदर्भग्रंथ, वाचनालय आणि अभ्यासकांसाठी विशेष विभाग देखील उभारण्यात येणार आहे. श्रीराम सृष्टी हा केवळ एक धार्मिक किंवा ऐतिहासिक प्रकल्प नसून, तो भारतीय संस्कृती, इतिहास आणि अध्यात्म यांचे संगमस्थान ठरणार आहे. या भव्य निर्मितीमुळे चासनळी हे नाव भावी पिढ्यांसाठी एक प्रेरणास्थळ ठरेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe