आकारी पडीत शेतकऱ्यांच्या प्रश्नी चार तालुक्यातील विविध संघटनांनी शेतकरी संघटनेस पाठींबा दिला आहे. पुढील १५ दिवसांत निर्णय न झाल्यास येत्या लोकसभेला मतदान न करण्याचा निर्णय घेतल्याचे शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांनी सांगितले.
दि. १२ मार्चपासून येथील तहसील कार्यालयात अकारी पडीत शेतकऱ्यांचे उपोषण सुरू आहे. या उपोषणात काल सोमवारी (दि. १८) काळे बोलत होते. ते म्हणाले, आकारी पडीत प्रश्नाबाबत दोन वर्षापासून शासनाकडे पाठपुरावा केला; परंतु शासकीय व्यवस्थेमधील लोक आडमुठेपणाची भूमिका घेत आहेत.

मधल्या काळात काही राजकीय घटना घडल्याने हा प्रश्न मागे पडला. त्यामुळे उपोषण सुरू करून येथील तहसीलदार, प्रांताधिकारी यांनी हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले. जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्रालयाकडे काय भूमिका मांडली ते आम्हाला कळू द्या. त्यांचे दायित्व आहे. पण कोणीतरी अडथळा आणतंय, आंदोलन करणे हे आमचे काम आहे. पण शासन दुर्लक्ष करीत असेल तर हा निषेध करण्याचा विषय आहे, असे ते म्हणाले.
आंदोलनात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुकाध्यक्ष युवराज जगताप, प्रहारचे अभिजित पोटे, निलेश शेडगे, भारत आसने, स्वभिमानीचे कचरू शेळके, त्र्यंबक भदगले, जालिंदर आरगडे, आप्पासाहेब दुस, लक्ष्मण खडके, प्रभाकर कांबळे आदी सहभागी झाले आहेत.
खासदार सदाशिव लोखंडे, आ. लहू कानडे, माजी आ. भानुदास मुरकुटे, माजी उपनराध्यक्ष करण ससाणे, सचिन गुजर, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, जितेंद्र भोसले, अभिजित पोटे, संजय छल्लारे, अशोक थोरे, नागेश सावंत, भागचंद औताडे, वकील संघ आदींनी उपोषणास पाठींबा दिला आहे.
सोमवारी प्रांताधिकारी कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता; परंतु दुपारी ४ वाजता प्रांताधिकारी कार्यालय अगोदरच कुलूप लावून बंद करण्यात आले. – अनिल औताडे, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी फोनद्वारे शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांच्याशी चर्चा केली. आचारसंहिता संपल्यावर पहिल्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.













