साहेब.. मुलीचा छळ करून खून करणाऱ्या सासरच्या लोकांना अटक करा..! ‘त्या’ कुटुंबाने केली पोलिस अधीक्षकांकडे मागणी

Ahilyanagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- सासरच्या लोकांनी पैशासाठी छळ करून विवाहितेला मारहाण केली व विहिरीत टाकून दिले. यात त्या विवाहितेच्या मृत्यूनंतर खूनाचा गुन्हा दाखल झालेल्या सासू-सासर्‍याला एमआयडीसी पोलिसांकडून अटक करण्यास टाळाटाळ केली जात

असल्याने खरवंडीच्या भोगे कुटुंबाने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन आरोपीच्या अटकेची मागणी केली आहे. याप्रकरणी त्यांनी निवेदन दिले आहे.

नेवासा तालुक्यातील खरवंडीचे सोपान भोगे यांची मुलगी कोमल हिचा विवाह नगर तालुक्यातील शिंगवे नाईक येथील रमेश बाळासाहेब जाधव याच्यासोबत झाला होता.

तिच्या मृत्यू प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती रमेश, सासरा बाळासाहेब जाधव व सासू सुनीता जाधव यांच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी पती रमेशला अटक केली असून सासरा बाळासाहेब व सासू सुनीता अद्याप पसार आहे. या दोघांना अटक करावी, अशी मागणी मयत कोमलचे वडिल सोपान भोगे, भाऊ अरूण भोगे,

प्रभाकर भोगे यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन केली आहे. सासरच्या लोकांनी पैशासाठी छळ करून कोमलला मारहाण केली व विहिरीत टाकून दिले, असा आरोप त्यांनी केला होता.

यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात खुनाचे वाढीव कलम लावले आहे. खूनाचा गुन्हा दाखल झाला तरी आरोपीला अटक होत नसल्याने भोगे कुटुंबाने अधीक्षक पाटील यांची भेट घेतली आहे. अधीक्षक पाटील यांनी आरोपींना अटक करण्याच्या सुचना पोलिसांना दिल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe