Ahmednagar News:कोणताही अन्याय फक्त शेतकऱ्यांनीच सहन करायचा का? आमच्या पोरांनाबी शिकून एमएससीबी मध्ये जाऊ द्या की कुठपर्यंत त्यांना जनावरे वळायला पाठवता.
जरा कंपनीचे लोड शेडिंग करून पहा जर याचा विचार झाला नाही तर आम्ही यापुढे कोणतेही बिल भरणार नाही. जो वसुलीला येईल त्यांना आमच्या शेतकऱ्यांना सामोरे जावे लागेल असा इशारा पारनेर तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात ढवळपुरी व परिसरातील शेतकरी व नागरिकांनी दोन दिवसापासून सिंगल फेज लोड शेडिंग केले असल्या कारणाने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले.
यात सध्या पाऊस नसल्याकारणाने विहिरीत अजून बादलीभर पाणीच आले नाही तर कोणत्या मोटारी चालू करणार, ज्या ज्या वेळेस लोड शेडिंग करायचे त्या त्यावेळेस वीज वितरण कंपनीला शेतकरी नेहमी मदत करतात.
आणि जर लोड शेडिंग करायचे असेल तर फक्त मळ्यांमध्येच वस्तीवर राहणाऱ्यांसाठीच का?तेच काही कालावधीसाठी गावठाणाला पण करा. सध्या चोरांचे प्रमाण सुद्धा वाढले आहे, बिबट्याची भीती आहे, तसेच संध्याकाळी ऐन दूध काढण्याच्या वेळेस लाईट नसते,
जनावरांना कुट्टी करावी लागते त्याच वेळेस लाईट नसल्याकारणाने आणि मुलांचा अभ्यासाच्या वेळेत लाईट नसते तेव्हा सिंगल फेज लाईट नियमित करावी असे निवेदन देण्यात आले. जर याचा विचार झाला नाही तर वीज कंपनीच्या कार्यालयावर धडक नेऊन गेट बंद आंदोलन करण्याचा इशारा केला आहे.