कोठला परिसरात राज चेंबर येथील सहा दुकाने जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त

Published on -

अहिल्यानगर – महानगरपालिकेने गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत गुरुवारी अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने मोठी कारवाई करत बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेली सहा दुकाने, हॉटेल्स जमीनदोस्त केले. राज चेंबर परिसरात पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

शहरात बेकायदेशीरपणे साइड मार्जिन न सोडता, पार्किंगसाठी जागा न सोडता, महानगरपालिकेची परवानगी न घेता खासगी जागेत, रस्त्यावर, रस्त्यालगत बांधकामे करून अतिक्रमणे केली जात आहेत. अशा अतिक्रमणांवर महानगरपालिकेकडून कारवाया सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेले पारिजात चौकातील पत्र्याचे १६ गाळे महानगरपालिकेने जमीनदोस्त केले. त्यानंतर बालिकाश्रम रस्त्यावरील महानगरपालिकेच्या जागेत असलेली बांधकामे, गाळे हटवली. दोन दिवसांपूर्वीच मुकुंदनगर परिसरात रस्त्याला अडथळा ठरणारी, तसेच महानगरपालिकेच्या मोकळ्या जागेत असलेली अतिक्रमणे जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली.

त्यानंतर आता महानगरपालिकेने कोठला परिसरात कारवाई सुरू केली आहे. गुरुवारी राज चेंबरच्या साइड मार्जिनमध्ये बांधण्यात आलेली दुकाने, हॉटेल्सची बांधकामे कारवाई करून हटवण्यात आली. या बांधकामांना दीड महिन्यांपूर्वी महानगरपालिकेने नोटिसा बजावल्या होत्या. अतिक्रमणधारकांनी कोर्टातून स्थगिती मिळवण्याचाही प्रयत्न केला. मात्र, सदर बांधकामे विनापरवाना असल्याने न्यायालयाने स्थगिती दिली नाही. त्यामुळे महानगरपालिकेने ही अतिक्रमणे जमीनदोस्त केली आहेत. महामार्गालगत असलेली व वाहतुकीच्या प्रमुख रस्त्यावर असलेली अतिक्रमणे हटवण्यात आल्याने नागरिकांकडून कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe