Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याला वाळूतस्करी व वाळूतस्कर यांचा मोठा शाप लागलेला आहे. महसूल यंत्रणा नेहमीच या लोकांवर नेहमीच कारवाई करत आलेली आहे. परंतु तरीही असे अवैध प्रकार घडतच असल्याचे चित्र आहे.
आता या वाळूतस्करांची मुजोरी इतकी वाढलियेकी ते थेट अधिकारी किंवा विरोध करणाऱ्या ग्रामस्थांनाच मारहाण करत आहेत. अशीच घटना घोगरगावच्या (ता. नेवासा) गावकऱ्यांबाबत घडली आहे.
वाळूउपशाला विरोध करणाऱ्या गावकऱ्यांवर वाळूतस्करांनी गावातच लाठ्या काठ्या व दगडांनी हल्ला केला. ही घटना शुक्रवारी (दि. ५) रात्री घडली. त्यात अनेक गावकरी जखमी झाल्याचे समजते.
दरम्यान, हा हल्ला तहसीलदारांच्या समोरच झाल्याचा आणि त्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप घोगरगावच्या ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी : हजारो डंपर वाळूउपसा घोगरगाव येथील गोदावरी नदीपात्रातून करण्यात येत असल्याचा घोगरगाव ग्रामस्थांचा आरोप आहे.
वाळूतस्करांच्या दहशतीमुळे ग्रामस्थ अक्षरशः जीव मुठीत धरून जीवन जगत असल्याचे सांगण्यात येते. शाळेत जाणारी मुले, महिला यांना यामुळे घराबाहेर पडणेसुद्धा मुश्कील झाले आहे.
दरम्यान, घोगरगाव येथील कणगरे कुटुंबाने रस्त्याच्या प्रश्नावरून गेल्या ६ दिवसांपासून सहकुटुंब उपोषण सुरू केले होते; परंतु याकडेसुद्धा तहसीलदारांनी डोळेझाक केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यानतर तहसीलदारांनी शुक्रवारी (दि.५) तेथे जाऊन त्यांची भेट घेतली.
त्या वेळी ग्रामस्थांनी वाळूउपशाच्या विरोधात जाब विचारत तहसीलदारांना घेराव घातला आणि पंचनामे करण्याची मागणी केली. त्यावर तहसीलदारांनी नंतर पाहू, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलतो, असे म्हणून काढता पाय घेतला.
मात्र त्याच वेळी वाळूतस्करांनी लाठ्या काठ्या, दगडांनी ग्रामस्थांवर जोरदार हल्ला केला. यात अनेक ग्रामस्थ गंभीर जखमी झाले, असे सांगण्यात आले.