Ahilyanagar News : एप्रिल ते मे या कालावधीत सर्व सर्पजातींचा मिलन व वंशवाढीचा प्रणयकाल सुरू असून, अनेक ठिकाणी उघड्यावर एकत्रित दिसणारे जुळे सर्प सहज नजरेस पडत आहेत. त्यामुळे त्यांना न मारण्याचे व त्यांच्या हालचालींविषयी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन सर्पमित्र संतोष बोरुडे यांनी केले आहे.
सर्पाच्या या नैसर्गिक प्रक्रियेबाबत माहिती देताना बोरुडे यांनी सांगितले की, साप हे शेतीस उपयोगी ठरणारे प्राणी असून, ते शेतातील पिकांचे नुकसान करणाऱ्या उंदरांवर नियंत्रण ठेवतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे ते खरे मित्रच मानले जातात.

या काळात परिसरात धामण, नाग, कोब्रा, घोणस, कवड्या, हिरवे साप, काळ्या रंगाचे साप आदी जाती सहज दिसतात. सध्या कडक उन्हामुळे जमिनीत उष्णता वाढली असून, ढगाळ हवामानामुळे साप सावली आणि गारवा असलेल्या ठिकाणी स्थलांतर करत आहेत.
हिरव्या पिकांच्या ओलसर कडेने, जसे की घास, मका, भुईमूग, ऊसाच्या कडेने किंवा झाडाच्या सावलीखाली साप आश्रय घेत असतात. या काळात मादी सर्प विशिष्ट गंध सोडून नराला आकर्षित करते. या गंधामुळे त्या जातीतील अनेक नर एका मादीच्या मागे फिरू लागतात.
मिलन झाल्यावर नर व मादी जोडीने फिरून अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागा शोधतात. मादी अंडी घालते आणि त्यानंतर सुमारे साडेतीन महिने अंड्यांना उबवते. नरसुद्धा पिल्ले बाहेर पडतील तोपर्यंत मादीचे संरक्षण करतो. यानंतर नर दुसऱ्या स्थळी निघून जातो.
या कालावधीत सापांच्या हालचाली अधिक प्रमाणात वाढतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी काम करताना विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन बोरुडे यांनी केले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी शेतात जाताना लक्ष देऊन, हातात टॉर्च आणि काठी घेऊनच काम करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.