Ahmednagar News:महाविकास आघाडी सरकारच्या काळात थांबलेला सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीचा निर्णय आताचे सरकार पुन्हा घेण्याच्या तयारीत आहे. तसे झाले तर पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे.
आज सकाळी राळेगणसिद्धीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना हजारे म्हणाले, ‘मॉल संस्कृती ही भारतीय नाही. ती विदेशी संस्कृती आहे. अशा मॉलमध्ये नशाजन्य पदार्थ विकायला ठेवायचे हे बरोबर नाही.
पूर्वी हा निर्णय घेतला तेव्हा आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावेळी तो थांबला. मला शाश्वती आहे, आता राज्यात जे सरकार आले आहे, ते मॉल आणि तेथे दारू विकायला ठेवयचा विचार करणार नाही,
असा मला विश्वास वाटतो. जर तसा निर्णय झालाच तर आम्हाला नाइलाजास्तव आमच्या मार्गाने जावे लागेल. पण अजून असा काही निर्णय आलेला नाही. आल्यानंतर पाहू. मात्र, ही आमची संस्कृती नाही,’
असेही हजारे यांनी ठणकावून सांगितले. महविकास आघाडीच्या सरकारने हा निर्णय घेतला तेव्हा राज्यात मोठा गदारोळ झाला होता. भारतीय जनता पक्षाने याला कडाडून विरोध केला.
महाराष्ट्राचे मद्यराष्ट करायचे आहे काय? असे तत्कालीन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला ठणकावून विचारले होते. त्याच दरम्यान अण्णा हजारे यांनीही या निर्णयाला विरोध केला होता. हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा हजारे यांनी दिला होता.