२२ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : शुक्रवार पासून दहावीची परीक्षा सुरू झाली असून, पहील्याच पेपरला जिल्ह्यातील ८५७ विद्यार्थ्यांनी दांडी मारली आहे. जिल्ह्यात १८४ परीक्षा केंद्र आहेत. त्या केंद्रांपैकी ३० केंद्रांना संवेदनशील परीक्षा केंद्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या केंद्रांवर गैरप्रकार रोखण्यासाठी ड्रोन कॅमेरे, व्हिडिओ शुटिंग करण्यात आले तसेच पोलीस गस्ती पथक व बैठे पथकही तैनात करण्यात आले होते.त्यामुळे पहिला पेपर कॉपीमुक्त गेला असून कोठेही अनुचित प्रकार घडला नाही, अशी माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली.
राज्य परीक्षा मंडळाकडून माध्यमिक शालांत परीक्षा (इयत्ता १० वी) मंगळवार पासून सुरू झाली आहे. जिल्ह्यात यंदा ५७ हजार ५९३ विद्यार्थी प्रविष्ष्ठ झाले होते. यातील ५६ हजार ७३६ परीक्षार्थीनी परीक्षा दिली आहे. तर ८५७ विद्यार्थ्यांनी पहिल्याच पेरपरला दांडी मारली. तसेच कॉपीमुक्त अभियानासाठी दक्षता समितीची स्थापना करण्यात आली आहे.

ही समिती जिल्ह्यात कॉपी सारखे गैरप्रकार आढळल्यास परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करणे, गैरप्रकारात सहभागी शाळेची मान्यता रद्द करणे आदी कारवाई करणार आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावर प्रत्येकी दोन बैठे पथकांकडून निगराणी ठेवण्यात येत आहे.तसेच परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात जिल्हाधिकारी यांनी प्रतिबंधात्मक आदेश घोषित केला आहे.
यंदा जिल्हा कॉपी मुक्त राहावा यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून त्यादृष्टीने तगडे नियोजन केले आहे. यापूर्वीच १२ वि चे पेपर सुरू झालेले असून ही परीक्षा देखील कॉपी मुक्त करण्यासाठी प्रशासनाने अत्यंत प्रभावीपणे नियोजन केलेले आहे. त्यामुळे आज पर्यंत सर्व परीक्षा सुरळीत सुरू आहेत.१२ वी पाठोपाठ आता १० वी चे देखील पेपर सुरू झालेले आहेत. त्यामुळे प्रशासन सतर्क असून कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही याची पूर्णपणे खबरदारी घेतली जात आहे.