१४ फेब्रुवारी २०२५ राहुरी शहर : शहरातील कादरी मशीद परिसरात एका ४० वर्षीय महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून दोन तरुणांनी तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी अडीच वाजता घडली.या प्रकरणी आयाज शफिक बागवान आणि आतीक रफिक बागवान (दोघे रा. राहुरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की पीडित महिला आपल्या कुटुंबासह राहुरी तालुक्यात राहाते.९ फेब्रुवारी रोजी दुपारी अशीच वाजेच्या सुमारास आरोपींनी महिलेच्या घराच्या दरवाज्यावर लाथा मारत शिवीगाळ केली.आवाज ऐकून महिला बाहेर आली आणि त्यांनी असे का करत आहात,अशी विचारणा केली. त्यावर आरोपींनी शिवीगाळ करत “तुझा मुलगा कैफ कोठे आहे ?” असे विचारले.

त्यानंतर त्यांनी महिलेच्या गळ्यातील पोत तोडून नुकसान केले तसेच तिचा हात पकडून साडीचा पदर ओढला,ज्यामुळे तिची लज्जा भंग पावेल असे कृत्य केले. एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी महिलेला जीव मारण्याची धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला.घटनेनंतर पीडित महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
त्यानुसार आरोपी आयाज शफिक बागवान आणि आतीक रफिक बागवान यांच्यावर गु. र.नं. १०५/२०२५ अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम ७४, ३५२, ३५१(२), ३२४ (४) अन्वये मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. महिलांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने ठोस कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.