Ahmednagar news : दहा वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावात भूस्खलन झाले होते. ग्रामस्थ झोपेत असताना पहाटे भूस्खलन झाले. मुसळधार पावसामुळे ही घटना घडली. या अपघातात किमान १५१ लोकांचा मृत्यू झाला होता. भूस्खलनानंतरही पाऊस सुरूच होता, त्यामुळे बचावकार्य कठीण झाले होते.परत अशी दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासन अलर्ट झाले असून, अकोले तालुक्यातील दोन गावातील नागरिकांना इतरत्र हलविण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे.
सध्या अनेक भागात पाऊस पडत आहे, यात डोंगर भागात भूस्खलन होण्याचा धोका असतो. या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील म्हाळुंगी येथे भूस्खलनची शक्यता व धोका लक्षात घेता सोंगाळवाडी व अस्वलेवाडी येथे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या ४० कुटुंबांना इतरत्र हलविण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. तशा नोटिसादेखील या कुटुंबांना बजावल्या आहेत.
अकोले तालुक्यातील म्हाळुंगी गावातील सोंगाळवाडी व अस्वलेवाडी येथे डोंगराच्या पायथ्याशी एकूण ४० कुटुंब राहातात. डोंगराचा वरचा भाग हा भुसभुशित झाला असल्याचे ग्रामपंचायतीच्या लक्षात आल्यावर व इथे काही घटना घडू शकते हे निदर्शनास आल्यानंतर ग्रामविकास अधिकारी ससाणे यांनी तातडीने अकोलेचे तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्या ही बाब लक्षात आणून दिली.
तसा लेखी अहवाल ससाणे यांनी तहसीलदारांना दिला. यानंतर तातडीने तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी या ठिकाणी भेट दिली व पाहाणी केली. त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या बांधकाम विभागाला याचा सर्व्हे करण्याचे आदेश दिले.
तातडीने या विभागाचे अधिकारी कर्मचारी याठिकाणी आले. त्यांनीही तहसीलदारांना अहवाल दिला. त्यानंतर सोंगाळवाडीचे २९ तर अस्वलेवाडीचे ६ व अन्य ६कुटुंबांना इतरत्र हलविण्याच्या बाबतीत हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत.
तशा नोटिसादेखील प्रशासनाने संबंधित कुटुंबांना दिल्या आहेत. त्यांना तात्पुरते येथील शाळा, सभामंडप येथे हलविण्यात येणार आहे. इथे जागा न झाल्यास ठाणगाव येथे सर्वांना हलविण्यात येणार आहे. माळीणसारखी घटना घडू नये, काही अनर्थ होऊ नये, यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे.