कृषीकायदा रद्द प्रकरणावर समाजसेवक आण्णा हजारे म्हणाले…विरोधकांचे नव्हे, हे आंदोलनाचे यश

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- केंद्र सरकारने तीन कृषी कायदे संमत केल्याच्या विरोधात दिल्ली सीमेवर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले आंदोलनाला अखेर यश आले आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंदोलकांना कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली. याप्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हा देशातील शेतकऱ्यांच्या एकत्रित आंदोलनाचा विजय आहे, हे यश विरोधी पक्षाचे नसून केवळ संघटितपणे शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचे विजय आहे.

असे म्हणत हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. पुढे बोलताना हजारे म्हणाले देशाचा इतिहास आहे की लाखो लोकांनी देशासाठी बलिदान दिले आणि त्यानंतर स्वातंत्र्य मिळाले.

त्याच पद्धतीने शेतकरी करत असलेले आंदोलन मिळालेले यशाचे श्रेय त्यांच्या आंदोलनाला द्यावे लागेल. शेतकऱ्यांच्या कृषी मालाला योग्य भाव मिळाल्यास त्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागणार नाही.

आता झालेल्या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांचे बळी गेलेले आहेत. शेतकऱ्यांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही असं अण्णांनी म्हटलंय.