अहिल्यानगर : आजकाल गुन्हेगार लोक सोशल मीडियाचा वापर दहशत पसरवण्यासाठी करत आहेत. गावठी कट्टा हातात घेऊन फोटो टाकून पोस्ट व्हायरल करणाऱ्या एका आरोपीला नुकतंच नगरमध्ये पोलिसांनी पकडलं.
याशिवाय खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आणि इतर गुन्हेगारही सोशल मीडियावर पोस्ट टाकून लोकांमध्ये भीती निर्माण करत आहेत. हा दहशतीचा नवा प्रकार आता सगळ्यांसमोर आला आहे.

आजच्या काळात सोशल मीडिया हा आपल्या आयुष्याचा एक भाग झाला आहे. त्याचा चांगला वापर होतोच, पण त्याचबरोबर गैरफायदा घेण्याचं प्रमाणही वाढत चाललंय.
गुन्हेगारांच्या टोळ्या एकमेकांना डिवचण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट टाकत आहेत. अशा घटना वारंवार घडताना दिसत आहेत.
नागापूर इथल्या वैभव नायकोडी या तरुणाच्या खुनानंतर लपका टोळीने सोशल मीडियावर पोस्ट टाकून दुसऱ्या टोळीला चिथावणी दिली होती. मिडिया वर टाकलेल्या या पोस्टमुळे दोन्ही टोळ्यांमध्ये भांडणं सुरू झाली आणि पुढे हा वाद टोकाला गेला.
त्याचप्रमाणे, मागच्या आठवड्यात एका इसमाने गावठी कट्टा हातात घेऊन फोटो टाकला आणि तो व्हायरल झाला. हा फोटो पोलिसांपर्यंत पोहोचला आणि कोतवाली पोलिसांनी त्या फोटोच्या आधारे त्या आरोपीला पकडलं.
गुन्हेगार अशा प्रकारे सोशल मीडियाचा वापर करत आहेत, पण यामुळे पोलिसांचं काम काहीसं सोपंही झालंय. पोलिस अशा गुन्हेगारांचा शोध घेत असतात आणि सोशल मीडियाच्या मदतीने अनेकांना पकडलंही आहे.
शेअर मार्केटमध्ये पैसे टाकले तर २० ते ३० टक्के नफा मिळेल, अशा खोट्या जाहिराती सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. या जाहिरातींवर विश्वास ठेवून अनेक लोक फसले आहेत आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
शेंडी इथल्या एका आयटी इंजिनीअरची तर एक कोटी रुपयांची फसवणूक झाली आणि त्याने सायबर पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे.
अनेकदा अल्पवयीन मुलींशी मैत्री करून त्यांच्यासोबत फोटो, व्हिडीओ काढले जातात. मग तेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केले जातात.
अशा अनेक घटना घडल्या आहेत. महिलांना आणि मुलींना अशा जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. त्यामुळे मुलींनी सावध राहावं, असं पोलिसांनी सांगितलं आहे.