पैसे भरूनही सोलर कृषिपंप मिळेनात, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष

Published on -

Ahilyanagar News : शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या मागेल त्याला सौर कृषीपंप योजना अत्यंत संत गतीने राबवली जात आहे. शेतकऱ्यांनी पैसे भरून दोन महिने उलटले तरी अद्याप शेतकऱ्यांना सौर कृषिपंप उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होत आहे.

शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत. यामध्ये वीज वितरण कंपनीकडून काही लोकांना अप्रूव्हल देणे बाकी आहे तर काहींना दिले असले तरी प्रत्यक्षात सौरपंप बसवण्यास विलंब होत आहे. दरम्यान, अजूनही अनेक शेतकरी मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. मागेल त्याला सौर कृषीपंप या योजने अगोदर शेतकऱ्यांसाठी मेडा आणि कुसुम या योजनेंतर्गत सौर कृषी पंप दिले जात होते.

यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली होती; परंतु नवीन योजना आल्यानंतर जुन्या सर्व शेतकऱ्यांना नवीन योजनेमध्ये वर्ग केले. यासाठी शेतकऱ्यांना सुरवातीला ऑनलाईन अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यानंतर वीज वितरण कंपनीकडून पेमेंट भरण्यासंदर्भात शेतकऱ्यांना मेसेज येतात. शेतकऱ्यांनी संबंधित पोर्टलवर पेमेंट केल्यानंतर विभागीय कार्यालयाकडून अप्रूव्हल दिले जाते. त्यानंतर पुन्हा लाईनमनकडून आयडी तयार करून दिला जातो. नंतर पुन्हा विभाग कार्यालयावर संबंधित अर्ज पाठवला जातो.

त्यानंतर त्यामध्ये शेतकऱ्यांची निवड करून सौर कृषीपंप पुरविणाऱ्या कंपन्यांना कळविले जाते. मात्र, अंमलबजावणीत गोंधळ होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. यंदा पाऊस झाल्याने पाण्याची उपलब्ध वाढली. रब्बी लागवडीचे क्षेत्रही वाढले आहे. त्यामुळे सिंचन क्षेत्र वाढल्याने अनेक शेतकऱ्यांनी नवीन विहिरी, बोअरवेल घेतले आहेत, त्यामुळे मागील त्याला सोलर योजनेंतर्गत अनेकांनी साधारण दोन तीन महिन्यांपूर्वी सोलर पंपासाठी अर्ज भरले होते.

दरम्यान, निवडणूक काळात काही दिवस या योजनेची साईट बंद झाली होती. महावितरण पोर्टलची साईट सध्या स्थितीत सुरू आहे. यात सोलर पंपासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांना पैसे भरण्याचा पर्याय आहे; परंतु पुरवठादार निवडण्याचा कोणताही पर्याय येत नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.

चार महिन्यांपूर्वी आपण कृषी सौरपंपासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करून त्याची रक्कमही भरली आहे. परंतु अद्याप सौरपंप पुरवठा करणाऱ्या कंपनीची नावे निवडण्याचा पर्याय खुला नसल्याने पैसे भरूनही पंप मिळत नाही, अशी स्थिती आहे. सध्या पाण्याअभावी रब्बीची पिके सुकू लागली असून, शासनाने रब्बी पिकाला उपयोग होईल, अशारितीने सौरपंप उपलब्ध करून द्यावेत.- शेषराव आपशेटे, शेतकरी, शहरटाकळी,

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe