प्रयागराजला गेलेल्या अहिल्यानगरमधील ‘त्या’ कुटंबासमवेत घडले असे काही

Published on -

Ahilyanagar News : सध्या देशभरातील भाविक महाकुंभमध्ये स्नान करण्यासाठी प्रयागराजला जात आहेत. अहिल्यानगर मधील देखील अनेकजण प्रयागराजला जावून आलेले आहेत. तर काहीजण अद्याप तिकडेच आहेत. असेच सावेडी उपनगरातील तपोवन रोडवरील नाना चौक येथील वर्मा कुटंबिय देखील प्रयागराजला गेले मात्र पाठीमागे त्यांच्या बंद घराच्या दरवाज्याचे कडी कोयंडा तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला.

आतील सामानाची उचकापाचक करुन बेडरूम मधील लोखंडी कपाटामधील सोन्या चांदीचे दागिने, व रोख रक्कम असा ६० हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला. याबाबत सुनीलकुमार पृथ्वीराज वर्मा (वय ३६, रा. सुखकर्ता अपार्टमेंट, नाना चौक, तपोवन रोड, सावेडी) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सुनीलकुमार वर्मा हे त्यांच्या घराला कुलूप लावून कुटुंबासह प्रयागराज येथे देवदर्शनासाठी गेले. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांना त्यांच्या भावाचा फोन आला की घराचे कुलूप, कडी, कोयंडा तुटलेला आहे. त्याने घरात जाऊन पाहिले असता बेडरूम मधील लोखंडी कपाट उचकलेले होते. बेडरूम मधील सामान अस्ताव्यस्त पडले होते.

कपाटातील एक जोड सोन्याचे कानातील टॉप्स, एक सोन्याची रिंग, अर्धा तोळे वजनाचे सोन्याचे एक मिनी मंगळसूत्र, आठ भाराचे चांदीचे पैंजण जोड, चार भाराचे दोन चांदीचे कडे, अर्धा ग्रॅम वजनाची नाकातील मुरणी, ६ हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज मिळून आला नाही. सगळा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला असल्याची त्यांची खात्री झाली. त्यामुळे त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe