अहिल्यानगर – स्वच्छता ही प्रत्येक शहराला त्याची स्वतंत्र ओळख निर्माण करून देते. शहराच्या सुदृढ आरोग्यासाठी स्वच्छता आवश्यक आहे. स्वच्छता व सुदृढ आरोग्य हा शहराच्या विकासाचा मूळ पाया असतो.आज अहिल्यानगर शहर वेगाने विकसित होत आहे.रस्त्यांची कामे आपण मोठ्या प्रमाणात करत आहोत.या कामांसह स्वच्छतेच्या माध्यमातून या शहराच्या विकासाला गती मिळेल व अहिल्यानगर शहराची एक स्वतंत्र ओळख स्वच्छतेच्या माध्यमातून निर्माण होईल, असा विश्वास आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी सकाळी शिल्पा गार्डन ते महेश थिएटर पर्यंत महामार्गावर स्वच्छता मोहीम पार पडली.
आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे, उपायुक्त विजयकुमार मुंडे, प्रियंका शिंदे, संतोष टेंगळे, सहाय्यक आयुक्त सपना वसावा, मेहेर लहारे, मुख्य लेखाधिकारी सचिन धस, मुख्य लेखा परीक्षक विशाल पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर शंकर मिसाळ,मनोज पारखे, वैभव जोशी, अशोक साबळे,परिमल निकम,आदित्य बल्लाळ ,अशोक जाधव,बबन काळे,शहाजान तडवी, राकेश कोतकर,शाम गोडाळकर,आदींसह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी, प्रभाग अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले होते.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Ahilyanagarlive-24-News-21.jpg)
नागरिकांनीही मोहिमेत सहभाग नोंदवला.येत्या १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरातही स्वच्छता करण्यात आली. शिवजयंती निमित्त मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवण्यात येणार आहेत.व्हॅलेंटाईन डे निमित्त बस स्थानक परिसरात पोस्टर बाजी करण्यात आली होती, ती काढण्यात आली.
या मोहिमेमध्ये उड्डाण पुलाखालील पिलर पाण्याने धुऊन स्वच्छ करण्यात आले प्लास्टिक कचरा, झाडांचा पालापाचोळा व अनेक महिन्यांपासून रोडच्या कडेला पडलेला कचरा व माती उचलून साफसफाई करण्यात आली.मोहिमेदरम्यान काही ठिकाणी अडथळा ठरणारी अतिक्रमणे, टपऱ्या व शेड देखील काढण्यात आल्या.
आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, शहराच्या स्वच्छतेसाठी महानगरपालिकेने सर्व त्या आवश्यक उपाययोजना केल्या आहेत.स्वच्छतेत सातत्य राखण्यासाठी प्रयत्न होत आहेत.मात्र, नागरिकांनी देखील स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला पाहिजे.येत्या काळात अहिल्यानगर शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही प्रत्येक नागरिकांनी घेतली पाहिजे.नागरिकांनी मनपाच्या दर आठवड्यात पार पडणाऱ्या स्वच्छता मोहिमेमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सहभाग घ्यावा,असे आवाहनही आमदार संग्राम जगताप व आयुक्त यशवंत डांगे यांच्या वतीने करण्यात आले.
दरम्यान, यापूर्वी महानगरपालिकेच्या वतीने पन्नासपेक्षा अधिक स्वच्छता मोहीम राबवण्यात आल्या. शहरातील माळीवाडा, तारकपूर, पुणे बस स्थानक परिसरात अनेक वर्षांपासून असलेला कचरा हटवण्यात आला होता.स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये कचरा विलगीकरणाची जनजागृती करण्यात आली. शहरातील चौकाचौकांमध्ये पथनाट्यांद्वारे जनजागृती करण्यात आली.स्वच्छ सर्वेक्षण २०२५ च्या पार्श्वभूमीवर मनपा शहर संपूर्णपणे स्वच्छतेबाबत उपाययोजना करणार आहे, असेही आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.