जग चंद्रावर तसेच मंगळावर गेले तरी आपण अजून रस्त्यांसाठी आंदोलने करत असल्याने आपण कोठेतरी मागे पडलो असल्याची खंत कुकडी कारखाना संचालिका डॉ. प्रणोती जगताप यांनी व्यक्त करत
श्रीगोंद्याच्या आमदारांनी टक्केवारी कमी केली तर तालुक्यातील रस्ते चांगले तसेच दर्जेदार होतील अशी खरमरीत टीका आ. पाचपुते यांच्यावर केली, अधिकाऱ्यांनी त्यांचे काम नीट पार पाडले तर नागरिकांना आंदोलन करण्याची वेळ येणार नसल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
तालुक्यातील सारोळा सोमवंशी ते चांभुर्डी रस्त्याचे काम गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. या रस्त्याचे काम तत्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी स्थानिक ग्रामस्थांनी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर भजन करीत कारभाराचा निषेध नोंदविला. यावेळी त्या बोलत होत्या.
सारोळा सोमवंशी ते चांभुर्डी या साधारपणे चार किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, संबंधित ठेकेदाराने केवळ रस्त्यावर मुरुम टाकला. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून या रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत बंद पडले आहे.
रस्त्यावर मुरूम टाकण्यात आल्याने प्रवाशांसह रस्त्यालगत राहणाऱ्या या धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी वेळोवेळी संपर्क साधून देखील या रस्त्याचे काम सुरू न झाल्याने आज (दि.१८) सारोव्य सोमवंशी व चांभुर्डी ग्रामस्थांनी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर भजन करीत निषेध नोंदविला.
रस्त्याचे काम सात दिवसांत सुरू करण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता विजय होके यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे, कुकडी कारखान्याच्या संचालिका डॉ. प्रणोती जगताप,बीआरएस चे समन्वय टिळक भोस, माजी सरपंच प्रविण आढाव, माजी सरपंच भाऊसाहेब पुरी, माजी सरपंच दादासाहेब ढगे, ग्रामपंचायत सदस्य सविप ननवरे,
पोलिस पाटील कैलास उदार, उद्धव आढाव, सोनबा आढाव, भानुदास कापे, राहूल आढाव, भाऊसाहेब खरमाळे, अर्जुन उदार, विजय नवले, संतोष ढगे, नारायण ननवरे, मिराबाई कवाष्टे, देवराम आढाव, शिलाबाई सोमवंशी, विशाल सुपेकर, अशोक आढाव, बाबूराव आगलावे, पांडुरंग नवले, दिलीप सोमवंशी बाबूराव उदार, अक्षय आढाव तसेच सारोळा सोमवंशीचे भैरवनाथ भजनी मंडळ व विठ्ठल चांभूर्डी भजनी मंडळातील भाविकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते