अहिल्यानगर- शहरात श्रीराम नवमीचा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाही रविवारी (दि. ६ एप्रिल) मिरवणुकीची जय्यत तयारी सुरू आहे. मात्र, मिरवणूक कोणत्या मार्गाने काढावी, यावरून हिंदू संघटना आणि पोलिस प्रशासन यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत.
पोलिसांनी निश्चित केलेल्या मार्गाला विरोध करत हिंदू संघटनांनी पारंपरिक मार्गावर मिरवणूक निघावी, अशी ठाम मागणी केली आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी गुरुवारी मिरवणुकीच्या प्रस्तावित मार्गाची पाहणी केली. २०१७ पासून माळीवाडा, पंचपीर चावडी, बॉम्बे बेकरी, चांद सुलताना हायस्कूल, माणिक चौक, कापडबाजार चितळे रोड, दिल्लीगेट असा मार्ग निश्चित करण्यात आला होता. त्याच मार्गाने यंदाही मिरवणूक काढावी, अशी प्रशासनाची भूमिका आहे.
मात्र, हिंदू संघटनांचा आक्षेप आहे की, हा मार्ग संकुचित असून, तेथे विद्युत तारा खाली आहेत, त्यामुळे मिरवणुकीस अडथळे येऊ शकतात. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची मिरवणूक ज्या मार्गाने निघते, त्याच मार्गाने श्रीराम नवमीची मिरवणूक काढावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हिंदू संघटनांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, कोतवाली पोलिस ठाण्याजवळून जाणारा पारंपरिक मार्गच योग्य आहे. या मार्गावर अनेक धार्मिक मिरवणुका पूर्वीपासून निघत आहेत. विशेषतः मोहरमच्या मिरवणुका गल्लीबोळातून निघत असताना त्यावर कोणी आक्षेप घेत नाही, मग श्रीराम मिरवणुकीसाठी अडथळा का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
जर पोलिसांनी मागणीनुसार मिरवणुकीला परवानगी दिली नाही, तर हिंदू संघटनांकडून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनीही आपली भूमिका स्पष्ट करत, कोणतीही गडबड झाल्यास त्याची जबाबदारी पूर्णतः पोलिसांवर असेल, असे म्हटले आहे.
२०१५ मध्ये श्रीराम नवमी मिरवणुकीस सुरुवात झाली. त्याच वर्षी दंगल घडल्याने २०१६ मध्ये प्रशासनाने अधिक सावध भूमिका घेतली. त्यानंतर २०१७ पासून ठराविक मार्गावरच मिरवणूक निघत आहे. २०२० आणि २१ मध्ये कोरोनामुळे मिरवणूक झाली नाही. २०२२, २३ आणि २४ मध्ये ती याच मार्गाने काढली गेली. मात्र, यावर्षी मार्ग बदलण्याची मागणी अधिक ठामपणे पुढे येत आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी मिरवणूक मार्गाची पाहणी करताना सुरक्षेचा आढावा घेतला आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षांत कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हा मार्ग योग्य आहे. मात्र, हिंदू संघटनांचा विरोध पाहता, या वादात आणखी तीव्रता येण्याची शक्यता आहे.