१३ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : अहिल्यानगरकडून पाथर्डीकडे जात असलेल्या एसटी बस आणि टेम्पोच्या झालेल्या भीषण अपघातात बस मधील १५ प्रवाशी जखमी झाले आहेत.हा अपघात बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर – पाथर्डी रोडवरील मेहेकरी फाट्याजवळील सदगुरु
विद्यालयाजवळ झाला.
याबाबत समजलेली माहिती अशी की बुधवारी दुपारी अहिल्यानगरकडून पाथर्डीकडे निघालेली राजगुरू डेपोची बस मेहेकरी फाट्या जवळील सद्गुरु विद्यालयाजवळ आली. यावेळी चालकाने समोर स्पीड ब्रेकर असल्यामुळे गाडी कंट्रोल केली मात्र त्याचवेळी पाथर्डीकडून भरधाव वेगात एक टेम्पो येत होता. या टेम्पो चालकाने देखील समोरचे स्पीड ब्रेकर पाहताच ब्रेक दाबला.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Ahmednagarlive-24-News-10.jpg)
मात्र अचानक ब्रेक दाबल्यामुळे टेम्पो आडवा झाला त्यामुळे बस चालकाने सावधानता बाळगत एसटी बाजूला घेण्याचा प्रयत्न केल्याने एसटी जवळच्या डाळिंबाच्या शेतात घुसली.या अपघातामध्ये एसटी बस मधील सुमारे पंधराहून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती समजली आहे.तर टेम्पोचा चालकही जखमी झाला.मात्र तो जखमी अवस्थेतच घटनास्थळावरून पसार झाला.
अपघाताची माहिती समजताच परीसरातील अनेक नागरिकांनी जखमींना मदत केली. तसेच नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी यांनी देखील तात्काळ घटनास्थळी येऊन जखमींना रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली व अपघात स्थळी झालेली वाहतूक कोंडी देखील तात्काळ सुरळीत केली.
दरम्यान पुण्याहून राजगुरू डेपोची बस पैठणकडे जात असताना मेहेकरी फाट्याजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पो चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडला असून या अपघातामध्ये माझ्या हाताला व पायाला इजा झाली असून बस मधील इतरही पंधरा ते वीस प्रवासी जखमी झाले आहेत. बसमध्ये एका महिलेकडे दोन-तीन महिन्याचे लहान बाळ देखील होते परंतु सुदैवाने या अपघातामध्ये ते सुरक्षित राहिले.असल्याची माहिती अपघातग्रस्त बसमधील एकाने दिली.