Tarakpur Bus Stand Ahilyanagar : नगर शहरातील तारकपूर भागात रस्त्याच्या कामामुळे एसटी बसेस येणे बंद झाले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून या समस्येकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
सध्या तारकपूर येथील मुख्य रस्त्याचे काम सुरू असून एका बाजूचे काम पूर्ण झाले आहे, मात्र दुसऱ्या बाजूचे काम अजूनही प्रलंबित आहे. त्यामुळे सकाळी ९ नंतर बसेस येणे थांबवण्यात आले आहे.

वाहतूक कोंडीचे कारण देत एसटी महामंडळाकडून हा निर्णय घेतला गेला आहे. मात्र या निर्णयामुळे स्थानिक नागरिक, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना बस पकडण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे.
तारकपूर बस स्थानकावरून दररोज अनेक प्रवासी कामानिमित्त शहराबाहेरील गावांमध्ये व इतर शहरांकडे प्रवास करतात. मात्र बससेवा अनिश्चित असल्याने अनेकांना निराश होऊन माळीवाडा किंवा स्वस्तिक चौक पुणे बस स्थानकाकडे वळावे लागत आहे. या ठिकाणी बस पकडण्यासाठी प्रवाशांची गर्दी होते, परिणामी प्रवास करणे कठीण होते.
विशेषतः पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई या ठिकाणी जाणाऱ्या बसेस तारकपूर स्थानकात न थांबता थेट पुढे जात आहेत. त्यामुळे नागरिकांना डीएसपी चौकात जाऊन बस पकडण्याची वेळ आली आहे. यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
दुसरीकडे माळीवाडा बस स्थानकाच्या नूतनीकरणामुळे तेथे जागा कमी पडत असून, हा ताण स्वस्तिक चौकातील पुणे बस स्थानकावर येत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी गर्दी वाढत असून, प्रवाशांची गैरसोय अधिकच तीव्र झाली आहे.
या पार्श्वभूमीवर, एसटी महामंडळ प्रशासनाने लवकरात लवकर यावर उपाययोजना करून पूर्वीप्रमाणे तारकपूर बस स्थानकात बसेस नियमित थांबविण्याची व्यवस्था करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे. आगामी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची संख्या वाढणार असल्याने, समस्येचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.