Ahilyanagar News : चिचोंडी पाटील सध्या शासनाने महिलांना एसटीमध्ये पन्नास टक्के सवलत दिल्याने एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे एसटीला काही प्रमाणात का होईना दिलास मिळला आहे.मात्र दुसरीकडे एसटीबसने प्रवास करणाऱ्या महिलांचे दागिने चोरीचे प्रमाण लक्षणिय वाढले आहे. त्यामुळे एसटीच्या सवलतीचा फायदा प्रवाशी महिलांपेक्षा भुरट्या चोऱ्या करणाऱ्यांचाच अधिक होत आहे.
कोरोनामुळे संपूर्ण अर्थविश्व थांबली होती त्यात महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली एसटी देखील सुटली नाही. या काळात प्रवासी संख्या घटल्याने एसटीची आर्थीक घडीच विरकटली त्यामुळे ही एसटी रूळावर आणण्यासाठी तत्कालीन सरकारने महिलांना एसटीप्रवास करताना तिकीटात पन्नास टक्के सवलत जाहीर केली. सरकारच्या या योजनेला महिलांनी भरभररून प्रतिसाद देत मोठ्या संख्येने महिला बसनेच प्रवास करण्यास पसंती देत असल्याने एसटीला देखील संजीवनी मिळाली.

मात्र आता वेगळीच समस्या उभी राहीली आहे ती म्हणजे बसस्थानकासह बसमध्ये असलेल्या महिलांच्या गर्दीचा फायदा घेत अनेक महिलांचे दागिने लंपास केले जात आहेत, त्यामुळे आता बसने प्रवास करणे म्हणजे चोरट्यांना आयती संधी देणे असेच समीकरण झाले आहे. मागील आठवड्यात नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील या गावात असाच चोरीचा प्रकार घडला होता. विशेष म्हणजे महिलांचे दागिने पळवणाऱ्यांमध्ये महिलांच्या टोळया सक्रीय झालेल्या दिसून येतात.
त्यामुळे या महिलांना ओळखने कठीण बाब आहे. चिचोंडी पाटीलच्या बस स्थानकावरती एसटी बसमध्ये चोरी करणाऱ्या महिलांना नागरिकांनी पकडून पोलिस पाटील संतोष खराडे यांच्या मदतीने संपर्क करुन त्या महिलाना पोलिसांच्या हवाली केले मात्र पोलिसांनी त्यांच्या विरोधात कोणीही फिर्याद देण्यास आले नसल्याने नंतर सोडून दिले. त्यामुळे या महिलांवर कोणतीच कारवाई झाली नसल्याने त्यांचे धाडस वाढत चालले आहे.
लहान मुलाचा वापर
अनेकदा बसस्थानकात अथवा बसमध्ये देखील अशा अनोळखी महिला त्यांच्या कडेवर लहान मुल घेवून थांबातात. लहान मुलाकडे पाहून त्यांना बसण्यासाठी कोणीही जागा देतात. त्यामुळे शेजारी बसलेल्या महिलेचे दागिने चोरणे त्यांना आनखी सोपे होते. मात्र यात धक्कादायक बाब म्हणजे कडेवर असलेले लहान मुल हे त्या महिलेचे असतेच असे नाही.
पोलिस पाटलांनी पुढाकार घेणे गरजेचे
बसमध्ये प्रवास करताना जर चोरीची घटना घडली असता, संबंधित गावातील पोलिस पाटलाने या घटनेबाबत स्वतः पोलिसांत फिर्याद द्यावी जेणेकरून यापुढे अशा घटनांना आळा बसेल. मात्र प्रत्यक्षात अशी घटना घडल्यास कोणीच पुढे येत नाही. त्यामुळे चोरी झालेल्या महिला देखील तक्रार देण्यास टाळाटाळ करतात. जर पोलिस पाटलांनी अशा घटनांमध्ये पुढाकार घेतल्यास फायदा होईल.