एसटीची ट्रेलरला धडक ; चालकासह ८ जखमी

Mahesh Waghmare
Published:

८ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : नगरहून पुण्याकडे चाललेल्या भरधाव वेगातील एसटी बसने पुढे चाललेल्या ट्रेलरला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात बस चालकासह ७ प्रवासी असे एकूण ८ जण जखमी झाले.या अपघातात बसचे प्रचंड नुकसान झाले आहे.नगर – पुणे महामार्गावर चास (ता. नगर) गावच्या शिवारात भारत पेट्रोल पंपासमोर रविवारी (दि.५) सायंकाळी हा अपघात झाला.

या अपघातात बस चालक उमेश प्रकाश सोनवणे (वय ३६, रा. शिरूर, ता. अंमळनेर, जि. जळगाव) तसेच प्रवासी बंडू शांताराम पवार (वय २८), पूजा बंडू पवार (वय २५), आर्यन बंडू पवार (वय २, सर्व रा. खडकी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव),लक्ष्मीबाई धोंड पाटील (वय ७५, रा. पारोळा, ता. जळगाव), फातिमा बाबूमिया जहागीरदार (वय ७०, रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर),आयेशा शाकीर सय्यद (वय ३०), अफजल शाकीर सय्यद (वय ९, दोघे रा. हडपसर, पुणे) हे जखमी झाले आहेत.

याबाबत ट्रेलर चालक समसाद खान (रा. छत्तीसगड) याने सोमवारी (दि.६) सायंकाळी नगर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बस चालक उमेश प्रकाश सोनवणे याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रेलर चालक समसाद खान हा त्याच्या ताब्यातील ट्रेलर (क्र. सीजी ०७, सीए ६१३८) घेवून रविवारी दुपारी ३.३० च्या सुमारास नगरहून पुण्याकडे जात असताना चास शिवारात पेट्रोल पंपासमोर पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अंमळनेर ते पुणे एसटी बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बस ट्रेलरवर आदळली.

या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.नगर तालुका पोलिस व महामार्ग पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला काढत वाहतूक सुरळीत केली.रविवारी दुपारी ३ च्या सुमारास नगर- पाथर्डी रोडवर मेहकरी गावच्या शिवारात खासगी बस व पिकअपची धडक झाली.

या अपघातात ३ जण जखमी झाले.नगरहून पाथर्डीकडे चाललेल्या पिक अपला समोरून भरधाव वेगात आलेल्या खाजगी आराम बसने जोराची धडक दिली. या अपघातात पिक अप चालक प्रवीण घनश्याम नेहूल व चालकाशेजारी बसलेले आदिनाथ चंद्रभान नेहल, सविता आदिनाथ नेहूल (सर्व रा. जवखेडे दुमाला, ता. पाथर्डी) हे जखमी झाले.

याबाबत आदिनाथ नेहल यांनी सोमवारी (दि.६) सायंकाळी नगर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून खाजगी बस (क्र. एमएच ०४, जीपी १२३२) वरील चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe