संगमनेर तालुक्यातील कसारवाडी शिवारातील मालपाणी हेल्थ क्लब अँड पॅलेसमध्ये बुधवारी दुपारी मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीत विवाह समारंभासाठी उभारण्यात आलेले स्टेज संपूर्णपणे जळून खाक झाले असून, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
मालपाणी हेल्थ क्लब हा परिसरातील प्रसिद्ध विवाह सोहळ्यांचे ठिकाण आहे. अनेक भव्य विवाह समारंभ येथे पार पडतात. या पार्श्वभूमीवर बुधवारी एका लग्न सोहळ्यासाठी मोठे स्टेज उभारण्यात आले होते. मात्र, दुपारी साडेतीनच्या सुमारास रखरखत्या उन्हामुळे स्टेजवरील डेकोरेशनने अचानक पेट घेतला. क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले.

घटनास्थळी उपस्थित कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. काही वेळातच अग्निशामक दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, या आगीत विवाहासाठी उभारण्यात आलेले स्टेज पूर्णपणे भस्मसात झाले.
प्राथमिक तपासात स्टेजच्या सजावटीसाठी वापरण्यात आलेल्या थर्माकोलमुळे आग अधिक तीव्र झाली असावी, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीने भविष्यात अशा समारंभांच्या आयोजनात अधिक खबरदारी घेण्याची गरज असल्याचे स्थानिकांनी व्यक्त केले आहे.