अहिल्यानगर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी संसदेचे लक्ष वेधणाऱ्या खा. नीलेश लंके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश आले असून राज्य शासनाच्या २३ मे रोजीच्या शासन निर्णयानुसार या महाविद्यालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात येणार आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असताना अहिल्यानगर जिल्ह्यात हे महाविद्यालय नसल्याने खासदार नीलेश लंके यांनी लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर संसदेमध्ये या विषयावर सातत्याने आवाज उठविला होता. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संबंधित केंद्रीय मंत्र्यांकडे खासदार सुप्रिया सुळे यांच्यामार्फत खा. लंके यांनी पाठपुरावा केला होता. केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर दि.६ मे रोजी जिल्ह्यातील चौंडी येथे पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच संलग्नित ४३० रूग्णखाटांचे रूग्णालय उभारण्यास मान्यता देण्यात आली होती. दि.२३ मे रोजी शासन निर्णय पारीत करण्यात आल्याने या महाविद्यालयाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
खा. लंके यांनी लक्ष वेधताच महाविद्यालयास मान्यता
राज्यातील पालघर, गडचिरोली, अमरावती, वाशिम, जालना, बुलढाणा, अंबरनाथ, भंडारा व हिंगोली येथे शासकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत २८ जुन २०२३ व १९ सप्टेंबर २०२३ रोजी मान्यता प्रदान करण्यात येउन त्यासंदर्भातील शासन निर्णय १४ जुलै २०२३ व १ नोव्हेंबर २०२३ रोजी निर्गमित करण्यात आले होते. त्याच वेळी अहिल्यानगर जिल्ह्यात सुयोग्य जागेेचे कारण पुढे करून या महाविद्यालयास परवानगी देण्यात आली नव्हती. त्याविरोधात खा. लंके यांनी आवाज उठविल्यानंतर चौंडी येथील मंत्रीमंडळाच्या बैठकीत अहिल्यानगरच्या महाविद्यालयास मान्यता देण्यात आली.
पंतप्रधानांचेही वेधले लक्ष !
सुयोग्य जागेचे कारण पुढे करून अहिल्यानगरच्या महाविद्यालयास परवानगी नाकारल्यानंतर खा. लंके यांनी या महाविद्यालयासाठी पाठपुरावा केला. थेट पंतप्रधानांपर्यंत कैफियत मांडण्यात आल्यानंतर राज्य मंत्रीमंडळाने महाविद्यालयाच्या उभारणीस मान्यता दिली. त्यानंतर हे महाविद्यालय नगर शहर सोडून शिर्डी येथे नेण्याचा घाट घातला गेला. ही बाब लक्षात आल्यानंतर खा. लंके यांनी त्यास प्रखर विरोध दर्शवत हे महाविद्यालय सर्व जिल्ह्याच्या हिताच्या दृष्टीने नगर शहराच्या १० ते १५ किलोमीटरच्या परिघातच उभारले जावे अशी आग्रही मागणी गेल्या सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.
खा. लंके यांच्याकडून जागांचा तपशील सादर
नगर शहराच्या परिघात सुयोग्य जागा नसल्याचे प्रशासनाकडून भासविले जात असल्याचे लक्षात येताच खा. नीलेश लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन नगर शहराच्या परिघात उपलब्ध असलेल्या जागांचा तपशील सादर केला आहे. त्यामध्ये आरणगांव ता. नगर, वडगांव गुप्ता ता. नगर, कांदा मार्केटजवळ, केडगांव, वाळुंज पारगांव ता. नगर, विळद ता. नगर, संभाजीनगर रस्त्यावरील इंद्रायणी हॉटेलजवळ, निंबळक ता. नगर, चास ता. नगर, पिंपळगांव माळवी ता. नगर, देहरे ता. नगर या जागांचा समावेश आहे.