काँग्रेस जिल्हाध्यक्ष काळें विरुद्ध पत्रकबाजी करणाऱ्या भुजबळांना प्रदेशाध्यक्ष आ. पटोलेंचा निलंबनाचा दणका

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑक्टोबर 2021 :- शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंच्या विरोधात सातत्याने पत्रकबाजी करत काँग्रेस पक्षाची बदनामी करीत पक्ष प्रतिमा मलिन करणाऱ्या पक्षाचे कार्यकर्ते बाळासाहेब भुजबळ यांच्यावर अखेर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांनी कडक कारवाईचा बडगा उगारला असून त्यांना पक्षातून निलंबित करत मोठा दणका दिला आहे.

तसा लेखी आदेश प्रदेशाध्यक्षांनी मुंबईतून काढला आहे. याबाबतची माहिती शहर जिल्हा काँग्रेसने दिली आहे. भुजबळ यांना प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी दि. ८ सप्टेंबर रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

शहर जिल्हा काँग्रेसने आयटी पार्क प्रकरणी घेतलेल्या भूमिके विरोधात केलेली जाहीर पत्रकबाजी, मनपा तिप्पट करवाढीच्या संदर्भात पक्ष विरोधी भूमिका घेत मनपात केलेले आंदोलन, महापौर निवडणुकी वेळी काळे यांच्या विरोधात केलेली पत्रकबाजी,

तिळगुळ वाटप कार्यक्रम आयोजन करत प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, माजी नगसेवक निखिल वारे यांच्या उपस्थितीत काळे यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटविण्याचा केलेला ठराव, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाचा गैरवापर करीत “जुन्या प्रदेशाध्यक्षांचे (ना. बाळासाहेब थोरात) निर्णय नवे प्रदेशाध्यक्ष फिरवणार” अशा आशयाच्या वर्तमानपत्रातून दिशाभूल होईल अशा पद्धतीने प्रसारित केलेल्या खोट्या बातम्या,

अहमदनगर शहर काँग्रेस व भिंगार काँग्रेसच्या नावाचा गैरवापर करत अधिकृत पक्ष संघटनेला समांतर भासावे अशा पद्धतीने मोर्चे, निदर्शने करत केलेले गैरवर्तन, सोशल मीडियावर शहर काँग्रेस अध्यक्ष असे खोटे पद लावत व्हायरल केलेल्या पोस्ट आदी विविध गंभीर ठपके भुजबळ यांच्यावर ठेवण्यात आले होते.

याबाबत भुजबळ यांनी उबेद शेख, श्याम वागस्कर, फिरोज शफी खान, अभिजीत कांबळे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष आ. पटोले यांची मागील आठवड्यात मुंबईत भेट घेऊन आपला खुलासा सादर केला होता. भुजबळ यांनी सादर केलेला खुलासा असमाधानकारक असल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या विरोधात सातत्याने भूमिका घेणाऱ्या गटाचे नेतृत्व करणाऱ्या भुजबळ यांनाच प्रदेश काँग्रेसने दणका दिल्यामुळे इथून पुढील काळात शहर पक्ष संघटनेमध्ये शिस्त पालन न करणाऱ्यांवर प्रदेश स्तरावरून कडक कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष पदावरून बाळासाहेब भुजबळ यांची हकालपट्टी करीत मनोज गुंदेचा यांची तत्कालीन प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने काळे यांनी वर्णी लावल्यानंतर जुनी शहर काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त झालेली आहे.

असे असताना देखील काही कार्यकर्ते भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली नगर शहर काँग्रेस व भिंगार काँग्रेस या नावांचा गैरवापर करत खोटी पदे लावत असल्याचे आढळून आले आहे.

इथून पुढे असा गैरप्रकार आढळून आल्यास त्यांच्यावर देखील पक्षाकडून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे देखील धाबे दणाणले आहेत. जगताप-काळे संघर्ष शहरात सर्वश्रुत आहे.

त्यातच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या राष्ट्रवादीचे आ.संग्राम जगताप यांचे समर्थन होईल अशा पद्धतीने जिल्हाध्यक्ष काळे यांच्या व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या भूमिके विरुद्ध भूमिका घेत पक्षाच्या नावाचा गैरवापर करीत पक्षविरोधी वर्तन भुजबळ सातत्याने करीत होते. यामुळे काँग्रेसच्या भूमिकेबद्दल समाजामध्ये संभ्रमाच्या संदेश जात होता.

मंत्री ना.बाळासाहेब थोरात समर्थक असलेल्या किरण काळे यांच्या पाठीशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.पटोले उभे राहिल्यामुळे काळे यांनी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना धोबीपछाड देत पक्षावर आपली मजबूत पकड असल्याचे यानिमित्ताने दाखवून दिले आहे.

ना.थोरात, आ.पटोले यांनी देखील काळे यांच्या पाठीशी उभे राहत काळे हेच नगर शहर काँग्रेसचे नेते असून त्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील काँग्रेस काम करेल हे यानिमित्ताने अधोरेखित करत पक्षांतर्गत शिस्त आणण्यासाठी कठोर पाऊले उचलली आहेत.

भुजबळ यांना जरी पक्षाने डच्चू दिला असला तरी देखील पक्षामध्ये काळे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात सध्या इनकमिंग सुरू आहे. नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यावेळी ना.थोरात, आ. पटोले यांनी काळे यांचे तोंड भरून कौतुक करत शहरातील आगामी निवडणुका काळे यांच्या नेतृत्वात लढल्या जातील असे मुंबईतून स्पष्ट केले आहे.

त्यातच भुजबळ यांची पक्षातून गच्छंती झाल्यामुळे पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांचे धाबे मात्र यामुळे दणाणले असून यानंतर आता कुणाचा नंबर लागतो याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe