अहमदनगर Live24 टीम, 13 ऑक्टोबर 2021 :- राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ या काळात अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झालं आहे.
या शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. एनडीआरएफ च्या निकषांची वाट न पहाता दहा हजार कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज राज्य सरकरानं जाहीर केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर या निर्णयाची माहिती दिली.
नैसर्गिक संकटामुळं बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी एनडीआरएफ ने ठरवून दिलेले निकष लावले जातात. मात्र. यासंबंधीचा अहवाल राज्याला प्राप्त झालेला नाही. त्यामुळे याची वाट न पाहता राज्य सरकराने मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यासाठी १० हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. जिरायतीसाठी प्रति हेक्टरी १० हजार रुपये, बागायतीसाठी प्रति हेक्टरी १५ हजार रुपये, बहुवार्षिक पिकांसाठी म्हणजे फळबागा वगैरे यांच्यासाठी २५ हजार रुपये प्रतिहेक्टरी मदत देण्यात येणार आहे.
जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंतच्या नुकसानीसाठी ही मदत देण्यात येणार आहे. या काळात नगर जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी भागातही मोठे नुकसान झालं होतं. त्या शेतकऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम