Ahmednagar News : संगमनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, अशी शिवप्रेमींनी अनेक वर्षांपासून बाळगलेली इच्छा आता पूर्ण होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळासाठी जिल्हा नियोजन समितीकडून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याने संगमनेर शहरामध्ये लवकरच छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभा राहणार आहे.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजाचे स्मारक उभारण्याकरीता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निधीची उपलब्धता करून दिली असून स्मारकाच्या उभारणीबाबत पालकमंत्र्यांसोबत लवकरच बैठक आयोजित करून जागेबाबतचा निर्णय केला जाणार असल्याची माहिती अमोल खताळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या सदस्याकडून स्मारकाच्या जागेसह इतर येणाऱ्या सूचनांनूसार कार्यवाही केली जाणार असल्याचे खताळ यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शहाजीराजे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संगमनेरच्या ऐतिहासिक भूमीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व्हावा, यासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आ. सत्यजित तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून
हा अश्वारूढ पुतळा व भव्य दिव्य शहीद स्मारक संगमनेर बस स्थानकाच्या परिसरात व्हावे, यासाठी आ. सत्यजित तांबे यांनी आग्रही मागणी केली असून या परिसरातच हे स्मारक होण्यासाठी प्रयत्न असल्याची माहिती माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी दिली आहे.
शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा संगमनेर मध्ये व्हावा, यासाठी आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेने सातत्याने पाठपुरावा केला आहे. याचबरोबर संगमनेर बस स्थानक परिसरात हा अश्वारूढ पुतळा व्हावा,
यासाठी संगमनेर नगरपालिकेने ३ जून २०१९ रोजी सर्वसाधारण सभेमध्ये ठराव देखील केलेला आहे. या स्मारकाबाबत आमदार बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात सातत्याने पाठपुरावा केला. मात्र सरकारमध्ये बदल झाल्यानंतर आ. तांबे यांनी या कामी पाठपुरावा सुरूच ठेवला.
याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्याकडे २१ ऑगस्ट २०२३ रोजी सदर बस स्थानकावरील एसटी महामंडळाची जागा नगरपालिकेकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी केली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आणि एसटी महामंडळाला तसा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, असे तांबे यांनी सांगितले.