शेवगाव येथे एसटी बसवर दगडफेक; बसचालक किरकोळ जखमी

Ahmednagarlive24 office
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यातच नगर जिल्ह्यातील शेवगाव आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन बससेवा सुरू केली आहे.

मात्र शेवगाव आगाराच्या बसवर दगडफेक होण्याच्या तीन घटना घडल्या आहेत. एका घटनेत बसचालक किरकोळ जखमी झाला असून बसच्या काचा फुटल्या आहेत. याबाबत घडलेली घटना अशी कि, शेवगाव ते नगर बसवर (क्रमांक एमएच ४० वाय ५४२८) तालुक्यातील अमरापूरजवळ दगडफेक झाली.

अज्ञात व्यक्तीने पाठीमागील बाजूने दगड मारल्याने बसची मागील काच फुटली आहे. तर शेवगाव-श्रीरामपूर बसवर (क्रमांक एमएच ४० एन ८८९५) सौंदळा (भेंडा नेवासा) येथे दगडफेक झाली. शेवगाव-पैठण बसवर (एमएम ४० एम ८७५२) दहिफळ फाटा येथे दगडफेक करण्यात आली आहे.

यामध्ये चालक नामदेव खंडागळे हे किरकोळ जखमी झाले आहेत. पोलिसांनी याची नोंद घेतली आहे. घटनास्थळीही पोलिस तात्काळ दाखल झाले. बससोबतही बंदोबस्त देण्यात येत आहे. दरम्यान परिवहन मंत्र्यांच्या आवाहनानंतर शुक्रवारी शेवगाव आगारातील एसटी कर्मचारी आणि आगारप्रमुख यांच्यात चर्चा झाली.

त्यानंतर संप मागे घेऊन सर्व कर्मचारी कामावर हजर झाले. बससेवाही सुरू करण्यात आली. मात्र, काही काळातच बसवर दगडफेकीच्या घटना घडल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe