पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळचे सरपंच संजय सुदाम रोकडे यांच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक केली. यामध्ये गाडीची पुढची काच फुटून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. यासबंधी वडगाव सावताळचे संजय सुदाम रोकडे (वय ४८, रा.वडगाव सावताळ) यांनी फिर्याद दिली.
अधिक माहिती अशी : १८ डिसेंबर २०२३ रोजी रात्री ९ च्या सुमारास वासुंदे वडगाव सावताळ मार्गावर सरपंच संजय रोकडे व्हेंटो गाडीने चालले असता टाकळी ढोकेश्वर ते वडगान सावताळच्या हद्दीत अज्ञात इसमाने गाडीवर दगड मारुन काच फोडली.

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. वडगाव सावताळ ग्रामपंचायत अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची पाहणी करत असताना हा प्रकार घडला असून वडगाव सावताळच्या पाणी चोरांनीच हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
वडगाव सावताळ गावांसह वाड्या वस्त्यांवर पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे. त्या पाईपलाईन मधून काही लोक पाणी चोरी करत आहेत. याची माहिती मला मिळाली आहे. त्यामुळे या पाणी चोरांनी माझ्यावर हल्ला केला असल्याचे सरपंच संजय रोकडे यांनी सांगितले.
या पाणी चोरांनी केलेल्या हल्ल्यामध्ये माझ्या गाडीचे मोठे नुकसान झाले असून या हल्ल्यातून मी बचावलो आहे. लवकरच या पाणी चोरांवर ग्रामपंचायतच्यावतीने गुन्हे दाखल करणार असल्याची सरपंच संजय रोकडे यांनी माहिती दिली.