जीवनात आनंदाच्या प्राप्तीसाठी गायीची किंकाळी थांबवा गायीचा तळतळाट सात पिढ्यांना भोगावा लागतो, गोधन हे राष्ट्र धन असल्याने जीवनात आनंदाची प्राप्ती होण्यासाठी अगोदर गायीची किंकाळी थांबवा.
तिला कत्तलखान्यात पाठवून पापाचे भागीदार होऊ नका, असे आवाहन गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी केले. तालुक्यातील मुरमे (देवगड ) येथील अखंड हरिनाम सोहळ्याची श्री क्षेत्र देवगड संस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने दहीहंडी फोडून भक्तिमय वातावरणात नुकतीच सांगता करण्यात आली.

या सोहळ्याच्या सांगता प्रसंगी गुरुवर्य भास्करगिरी महाराज म्हणाले की, अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून भगवंताबद्दल असलेला भक्तिभाव दृढ होत असतो, आपल्याला पूर्वजांनी जे संस्कार दिले आहे.
ते जर जपले तर ते कुटुंब सदैव सुखी रहाते.परमार्थ करतांना श्रद्धेला धक्का लागणार नाही याची काळजी घेत तो जपला पाहिजे. गायीचे स्थान आपल्या संस्कृतीत आई इतकेच मोठे आहे.
गो रक्षा ही राष्ट्र रक्षाप्रमाणे असल्याने कत्तलखान्यात जाणाऱ्या गायीची किंकाळी ही थांबली पाहिजे. गायीला कत्तलखान्यात पाठवू नका. कारण तिचा तळतळाट हा सात पिढ्यांना भोगावा लागतो.
त्यामुळे तिचे रक्षण करण्यासाठी पुढे या, अंतःकरणाला पवित्र करण्यासाठी जीवनात संत चरित्र श्रवण करा, आहारात गायीच्या दुधाचे सेवन करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी पंचक्रोशीतील ग्रामस्थ व सोहळा कमिटीचे सदस्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.