जिल्ह्यात मान्सूनची दमदार हजेरी : वीज कोसळून जनावरे दगावली, वादळाने फळबागांचे नुकसान

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : जून महिन्याच्या सुरुवातीलाच मृग नक्षत्रात जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.गेल्या काही वर्षात पर्जन्यमान हे कमी जास्त असल्यामुळे बळीराजा चिंतेत होता. उशिराने मान्सून आल्यामुळे लागवडीही उशीरा होत असे; परंतु यावर्षी सुरूवातीलाच्या नक्षत्रामध्ये पाऊस पडण्यास सुरुवात झाली असुन तुर, बाजरी, मुग,उडीदाची, पेरणी होणार असुन तर कपाशीची विक्रमी लागवड होण्याची चिन्हे आहेत. मात्र दुसरीकडे या पावसात वादळी वारे व वीज कोसळण्याच्या देखील घटना घडल्या आहेत, यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

कर्जत तालुक्यातील राशीन येथे वादळी वाऱ्यासह, विजेच्या कडकडाटामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. वादळी पावसाने राशीनमध्ये जोरदार तडाखा बसला असून, त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.येथील सुनील रामचंद्र आढाव यांच्या राहत्या घराजवळ रात्री सव्वाआठ वाजता वीज कोसळली. त्यामध्ये एक गिरगाय, बैल, कालवड या जनावरांचा जागीच मृत्यू झाला.

वीज कोसळल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांचे पंखे, फ्रिज, इन्वर्टर, यासह विद्युत उपकरणे जळाली आहेत तसेच राजेभोसले वस्ती येथील कमलदेव गायकवाड, यांच्या लिंबोणी बागेचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे लिंबोणीचे झाडे उन्ममळून पडली. शहरात वीजपुरवठा करणाऱ्या लाईनवर वीज कोसळल्याने विद्युत पुरवठा रात्रीपासून खंडित झाला होता. शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव परीसरात यावर्षी जुन महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असुन, सध्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे.

गरडवाडी परीसरात रविवारी दुपारी वादळासह मुसळधार पाऊस झाला. वादळाने सुनिता पोपट केदार, या शेतकरी महिलेच्या राहत्या घराची भिंत कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकऱ्याचा संसार उघड्यावर आला आहे. गरडवाडी परीसरात रविवारी दुपारी मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस झाला. वादळ मोठ्या प्रमाणात असल्याने व पाऊस मुसळधार असल्यामुळे झाडासह घरांची पडझड मोठ्या प्रमाणात होऊन नुकसान झाले आहे.

पाथर्डी तालुक्यामध्ये आज झालेल्या मृग नक्षत्राच्या पावसामुळे पूर्व भागातील पेरण्यांना मोठ्या प्रमाणात वेग येणार आहे; परंतु औरंगपूर येथील राजेंद्र रामनाथ किलबिले यांच्या मालकीच्या दोन म्हशी वीज पडल्याने मृत्युमुखी पडल्या आहेत. तसेच आंबा बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe