Milk Subsidy : दूध संघाच्या उत्पादकांना अनुदान वर्ग, अनुदानास पात्र ठरणारा जिल्ह्यातील पहिलाच सहकारी दूध संघ

Ahmednagarlive24 office
Published:
Milk Subsidy

Milk Subsidy : राज्यातील दूध उत्पादकांना दूध दर कमी झाल्यामुळे मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आलेला होता. त्यामुळे सातत्याने दूध उत्पादकांना दूध अनुदान मिळावे अशी मागणी दूध उत्पादकांकडून होत होती, यासाठी राज्यभर आंदोलने झाली होती.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून दुग्ध व्यवसाय विकास विभाग व शासनाने राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर ५ रूपये अनुदान देण्याचा शासन निर्णय ५ जानेवारी २०२४ रोजी घेतला होता.

त्यानंतर ११ जानेवारी ते १० मार्च २०२४ पर्यंत प्रती लिटर ५ रूपये या कालावधी करीता दूध उत्पादकांना अनुदान देण्यात येणार आहे. सदर निर्णयानुसार दूध उत्पादक जनावरांचे ऑनलाईन टॅगींग व शासनाच्या निकषानुसार पात्र असणाऱ्या फॅट व एस.एन. एफ. असणाऱ्या दुधास अनुदान देण्याचे ठरले होते.

या निकषानुसार अहमदनगर जिल्ह्यातील सहकारी दुध संघापैकी फक्त श्री वृध्देश्वर सहकारी तालुका दुध संघ यांनी पहिल्या दसवड्याकरीता सर्व निकष पुर्ण करुन ऑनलाईन माहिती दुग्ध विकास खात्यांच्या वेबसाईटवर अपलोड केली.

हे प्रस्ताव दुग्ध व्यवसाय विकास विभागाने तपासून श्री वृध्देश्वर तालुका दुध संघाच्या उत्पादकांना तातडीने ऑनलाईन अनुदान देण्यास सुरुवात केली आहे. पात्र दुध उत्पादकांच्या बँक खात्यावर सदर अनुदान वर्ग झाले आहे.

दुध उत्पादकांना अनुदान मिळवून देण्यासाठी श्री वृध्देश्वर सहकारी तालुका दुध संघास मार्गदर्शन व दुग्ध विकास मंत्री मा.ना.श्री. राधाकृष्णजी विखे पाटील, यांचेकडे सातत्याने पाठपुरावा करण्याचे काम आमदार मोनिकाताई राजीव राजळे यांनी केले आहे. आज अहमदनगर जिल्हयात सर्व सहकारी प्रकल्पापैकी श्री वृध्देश्वर सहकारी तालुका दुध संघ हा संघ अनुदान वर्ग होण्यास पात्र झाला आहे.

दुध उत्पादकांना प्रती लिटर ५ रूपये अनुदान प्राप्त ते होवून ते बँक खात्यात वर्ग झाल्याने दुध उत्पादक शेतकरी समाधानी झाला आहे. या शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीच्या काळात अनुदान देण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेतल्याबद्दल संघाचे संचालक राहुल राजळे यांनी दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा. सुजय विखे पाटील व आमदार मोनिकाताई राजळे यांचे दुध उत्पादकांच्या व संघाच्या वतीने आभार मानले आहेत.

वृध्देश्वर सहकारी तालुका दूध संघाने जिल्हयातील सर्व संघात प्रथमतःअनुदानाची माहिती योग्यरित्या ऑनलाईन पाठवून शासनाचे निकषास पात्र होवून दुध उत्पादकांसाठी अनुदान मिळवून देण्यास मोठी कामगिरी केल्याबद्दल आमदार मोनिकाताई राजळे यांनी जिल्हा दुग्ध शाळा विकास अधिकारी सोनोने, संघाचे सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe