अकोले शहरात शिरलेल्या बिबट्याला पकडण्यात यश

Published on -

Ahmednagar News : अकोले अकोले शहरातील कोल्हार- घोटी रोडलगत असलेल्या वसंत मार्केटमध्ये बिबट्या शिरल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाने नाशिक येथील रेस्क्यू टीमला पाचारण करून तब्बल सहा तासांच्या अथक परिश्रमानंतर बिबट्याला पकडण्यात यश आले.

त्यानंतर सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप कदम यांच्या नेतृत्वाखाली वनविभाग व पोलिसांचे पथक बिबट्याच्या मागे गेले. त्यांनी तब्बल सहा तास बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न केले; परंतु बिबट्या हाती लागत नाही,

हे लक्षात आल्यानंतर नाशिक येथील रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. त्यानंतर या ऑपरेशनला वेग आला.

अकोले शहरातीला बाजारतळालगत असलेल्या वसंत मार्केटमध्ये कॉम्पलेक्समधील निलेश आवारी यांच्या किराणा दुकानाच्या ओट्याखाली असलेल्या कपारीत बिबट्या असल्याचे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तेथून जात असलेले अॅड. बी.जे. वैद्य यांच्या लक्षात आले.

त्यांनी तात्काळ वनाधिकारी व पोलिसांना सांगितले. तात्काळ वनाधिकारी प्रदिप कदम यांच्या आदेशाने कर्मचाऱ्यांचे पथक पथक पिंजरा, जाळी आदी साहित्य घेऊन त्या ठिकाणी पोहचले. यावेळी बिबट्याला बघण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

गर्दीमुळे कोल्हार-घोटी राज्यमार्गावरील वाहतुकही जाम झाली होती. याठिकाणी पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी स्वतः बंदोबस्तासाठी येऊन गर्दी पांगवत वाहतूक सुरळीत केली व वनविभागाच्या पथकाला मदतीसाठी पोलिस कर्मचाऱ्यांना पाठवले.

यावेळी वनविभागाच्या पथकाने पिंजरा लावून त्यामध्ये कोंबडी ठेवून तसेच पिंजऱ्याच्या बाजूला जाळी मारुन बिबट्याला जेरबंद करण्याचे नियोजन केले. साडेतीन तास हा थरार सुरू होता. रात्री ८:३० पर्यंत बिबट्या त्या कपारीतुन बाहेर निघाला नव्हता.

त्यानंतर नाशिक येथील रेस्क्यू टीमला बोलावण्यात आले. या पथकाने बिबट्याला बेशुद्ध करून बाहेर काढले. त्यानंतर त्याची तपासणी करण्यात येऊन त्याला मनोहरपूर येथील नर्सरीमध्ये नेण्यात आले. हा बिबट्या सात ते आठ वर्षांचा असावा,

असे वनाधिकारी कदम यांनी सांगितले. या दरम्यान वसंत मार्केटमधील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. यावेळी पोलीस निरीक्षक पाटील, उपनिरीक्षक भूषण हांडोरे, कर्मचारी खैरनार, विठ्ठल शेरमाळे, सुहास मोरे यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe