Success Story : शेती हा तोट्याचा व्यवसाय असल्याची धारणा आजही अनेकांच्या मनात आहे. हवामानातील अनिश्चितता, अवकाळी पाऊस, दुष्काळ, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारातील चढ-उतार यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी आव्हाने उभी ठाकतात.
मात्र योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि बाजारपेठेचा अभ्यास यांच्या जोरावर शेतीतून चांगला नफा मिळवता येतो, हे अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील ओगदी गावातील शेतकरी मनोज गोणटे यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

मनोज गोणटे यांच्या कुटुंबाकडे वडिलोपार्जित शेती आहे. पूर्वी ते सोयाबीन, मका आणि तूर यांसारखी पारंपरिक पिके घेत होते. मात्र वाढत्या खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी मिळत असल्याने आर्थिक प्रगती होत नव्हती.
त्यामुळे त्यांनी पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यास सुरुवात केली. बाजारातील मागणी, दरातील चढ-उतार आणि इतर प्रगत शेतकऱ्यांचे अनुभव यांचा अभ्यास करून त्यांनी नगदी पीक म्हणून आल्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला.
अवघ्या ३० गुंठे क्षेत्रात त्यांनी माहीम जातीचे आठ क्विंटल बियाणे लावले. लागवडीपूर्वी जमिनीची मशागत, सेंद्रिय खतांचा वापर आणि योग्य बेसल डोस देण्यात आला.
पाण्याचे नियोजन, वेळेवर तणनियंत्रण आणि रोग व्यवस्थापन याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. संपूर्ण पिकासाठी सुमारे साडेचार लाख रुपयांचा खर्च आला. आले हे खर्चिक पीक असले तरी योग्य व्यवस्थापनामुळे उत्पादनात वाढ झाली.
१४ महिन्यांनंतर पीक काढणीस आले तेव्हा बाजारभाव घसरले होते. मात्र घाई न करता त्यांनी आले साठवून ठेवले आणि योग्य दराची प्रतीक्षा केली. काही महिन्यांनी बाजारभाव वाढून प्रति किलो ४० रुपये दर मिळाला.
एकूण २८० क्विंटल उत्पादनातून त्यांना सुमारे नऊ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. खर्च वजा जाता साडेचार लाख रुपयांचा निव्वळ नफा त्यांच्या हाती आला.
मनोज गोणटे यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे परिसरातील शेतकऱ्यांना नवी दिशा मिळाली आहे. नियोजनबद्ध शेती, संयम आणि बाजारपेठेचा अभ्यास असेल तर कमी क्षेत्रातूनही मोठा नफा मिळवता येतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे.













