Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांच्या स्वागताची अहमदनगर जिल्ह्यात जय्यत तयारी

Ahmednagarlive24 office
Published:
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी पारनेर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे. येथील ऐतिहासिक बाजारतळावर शनिवारी, (दि. २३) मार्च रोजी दुपारी होणाऱ्या सभेच्या नियोजनासाठी तालुक्यातील विविध गावांमधून नियोजन केले जात आहे.

दरम्यान, राज्याच्या विविध भागात जरांगे यांच्या सभांना परवानगी मिळत नसल्याने आयोजक चिंतेत होते. मात्र, पोलीस प्रशासनाने सभेला परवानगी दिल्याने आयोजकांचा उत्साह वाढला असून, सभेच्या तयारीला वेग आला आहे.

जरांगे यांच्या स्वागताची जंगी तयारी सुरू आहे. तब्बल ५० जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. त्यासाठी १ टन फुलांची ऑर्डर देण्यात आली आहे. वडझिरे येथील समाज बांधवांनी गुलाबाच्या फुलांची वृष्टी करण्याचे नियोजन केले आहे.

त्याचबरोबर क्रेनच्या साहाय्याने जरांगे यांना ५१ फुटांचा गुलाब पुष्पांचा हार घालण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बाजारतळावरील स्थायी स्वरूपाच्या व्यासपीठाच्या रंगरंगोटीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

प्रत्येक जिल्हा परिषद गटात वाहनांवर बसवलेल्या ध्वनीक्षेपकावरून सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गावागावांत सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन करणारे फलक लावण्यात आले आहेत.

शांततेत होणाऱ्या मराठा आंदोलनाची परंपरा पाळण्याची जबाबदारी प्रत्येक समाजबांधवावर आहे, त्यामुळे सभेला गालबोट लागेल असे कृत्य कोणीही करू नये असे आवाहन करतानाच मराठा बांधव शिस्तीचे दर्शन घडवतील असा विश्वास पारनेर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

मोठा पोलीस बंदोबस्त

जरांगे पाटलांच्या सभेसाठी पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. सभेसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. पोलीस अधिकारी ५, पोलीस अंमलदार ५०, महिला पोलीस अंमलदार १०, वाहतुक पोलीस अंमलदार ५, स्थानिक गुन्हे शाखा (साध्या वेशात) १०, स्ट्रायकिग फोर्स १. असे बंदोबस्ताचे नियोजन आहे.

सभेसाठी येणाऱ्या समाजबांधवांनी सोन्याची चेन, ब्रेसलेट, मोठी रक्कम जवळ बाळगू नये. आपल्याकडील मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe