कर्डिले, जगताप, कोतकर यांच्यामुळेच झाला सुजय विखेंचा पराभव !

Pragati
Published:

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नगर शहरात मिळालेल्या मतदानातून मोठ्या प्रमाणात भाजपा व माझ्यामुळेच विखेंना नगर शहरातून ३१ हजारांचे लीड मिळाले आहे. त्याचे श्रेय घेण्याचा लाजिरवाणा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून व काही वृत्तपत्रांमधून जाणून बुजून चालू आहे,

अशी भूमिका भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंत लोढा यांनी स्पष्ट केली. भाजपचे मोठ्या प्रमाणात मतदार आहेत. १९९१ साली राजाभाऊ झरकर लोकसभेला उभे होते. त्यांना मिळालेल्या एकूण मतांत नगर शहरातून २४ हजार मते मिळाली होती. विखे विरुद्ध गडाख यांच्या अटीतटीच्या निवडणुकीत ही मते मिळाली होती.

दिवंगत माजी खा. दिलीप गांधींना मोठे मताधिक्यही नगर शहरातून मिळत होते. तसेच खासदार विखे यांना २०१९ च्या निवडणुकीत ५४ हजार मताधिक्य होते. त्यापेक्षा जास्त मताधिक्याची यावेळेस अपेक्षा होती परंतु २०२४ च्या निवडणुकीत सहकारी पक्षांचा विचार केला

तर लीड फक्त ३१ हजारांचे मिळाले. त्यास नगर शहराच्या लोकप्रतिनिधीबाबत असलेली नाराजी, त्यांची व त्यांच्या टोळीची असलेली दहशत अवैध धंदे, व्यवसायाचे वाढलेले मोठे जाळे, त्यांच्या माध्यमातून जागा ताबामारी, शहरात होणारे खुनांचे सत्र, एस.पी. ऑफीस प्रकरण, पोलिसांना हाताशी धरून विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणे आदी प्रकार शहरात चालू आहेत.

आता तर सत्तेत असल्याने या सर्व गोष्टींना राजाश्रय मिळाल्यासारखे झालेले आहे. त्यामुळे नगर शहरातील व्यापारी, बाजारपेठेत व सर्वसामान्य नागरिकांत मोठ्या प्रमाणात त्यांच्याबद्दल नाराजी होती. विखे यांना मत दिले, तर त्यांची दहशत गुंडगिरी व अवैध व्यवसाय, जागा ताबामारी अजून मोठ्या प्रमाणात वाढेल.

या विचारातून तसेच विखे यांच्या फॉर्म भरायच्या मिरवणुकीत ज्या पद्धतीने शक्ती प्रदर्शन झाले. त्यात कर्डिले, जगताप, कोतकर त्यांचा मोठ्या प्रमाणावर परिणाम शहरातील लोकांवर झाला. त्यामुळे लीड कमी झाले. कमी लीडमुळे विखेंचा पराभव झाला, असा दावा वसंत लोढा यांनी केला आहे.

‘ते’ लीड भाजपच्या वाट्याचे..!
नगर शहरातून ३१ हजारांचे लीड मिळाले आहे. ते भारतीय जनता पार्टीचे आहे. त्याचे श्रेय घेण्याचा कोणी प्रयत्न करू नये. नगर शहरात भाजपाने स्वः बळावर विधानसभा निवडणूक या प्रवृत्तीच्या विरोधात लढवावी. त्याबाबत शहराची सध्याची असलेली भयानक परिस्थिती वरिष्ठांना पुराव्यासह देऊनही निवडणूक आम्ही लढून जिंकू असा आत्मविश्वास वसंत लोढा यांनी व्यक्त केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe