Ayushman Golden Card : सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानून आरोग्याच्या सेवा मोफत व अधिक दर्जेदार मिळाव्यात यासाठी शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. आयुष्मान भारत योजनेंतर्गत पाच लक्ष रुपयांपर्यंत उपचार मोफत स्वरुपात देण्यात येत असल्याने
या योजनेंतर्गत गोल्डन कार्ड नोंदणी प्रक्रियेला अधिक गती देण्याचे निर्देश आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. शेटे यांच्या उपस्थितीत आयुष्मान भारत, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानातील पायाभूत सुविधांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, आयुष्मान भारत योजनेचे विभागीय व्यवस्थापक डॉ वसीम शेख, जिल्हा समन्वयक डॉ. मयूर मुथा, जिल्हा समन्वयक रोहित कारंडे आदी उपस्थित होते.
आयुष्मान भारत योजनेंतर्गत कोल्हापूर व अहमदनगर हे दोन जिल्हे कार्ड वितरणामध्ये राज्यात अग्रेसर आहेत. जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत डॉ. शेटे म्हणाले की, जिल्ह्यातील एकही पात्र लाभार्थी आरोग्य उपचारापासून वंचित राहणार नाही
यासाठी आरोग्य यंत्रणा सोबत इतर संबंधित शासकीय यंत्रणांनी गोल्डन कार्ड नोंदणी व प्रत्यक्ष लाभार्थ्यांना वितरण प्रक्रिया गतिमान पद्धतीने राबवावी. या योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांच्या होईल यादृष्टीने प्रयत्न करावेत.
महापालिका क्षेत्रात कार्डची नोंदणी कमी असल्याने महापालिकेने सूक्ष्म नियोजन करत या कामाचा दैनंदिन आढावा घ्यावा. जिल्ह्यातील धार्मिक स्थळांच्या ठिकाणी मोहिमेसाठी देवस्थान व्यवस्थापनाची मदत घ्यावी.
त्याचबरोबरच प्रत्येक रुग्णालयामध्ये गोल्डन कार्ड नोंदणी व वितरणासाठी विशेष कक्ष सुरु करण्यात यावा. जिल्ह्यातील सीएससी केंद्रांनी राष्ट्रकार्य म्हणून अधिकाधिक कार्डची नोंदणी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. बैठकीस आरोग्य विभागाचे अधिकारी व जिल्ह्यातील खासगी रुग्णालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्ह्यात आतापर्यंत साडेबारा लाख कार्ड वितरित
प्रारंभी आयुष्मान भारत योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. मयूर मुथा यांनी या योजनेंतर्गत जिल्ह्यात केलेल्या कामाची माहिती सादर केली. जिल्ह्यात आयुष्मान भारत योजनेंतर्गत ३१ लाख ६५ हजार १२५ लाभाथ्यापैकी १२ लाख ५१ हजार ७३३ लाभार्थ्यांना
गोल्डन कार्ड वितरित करण्यात आले असून उर्वरित कार्डधारकांची नोंदणी करुन कार्ड वितरणाची कार्यवाही सुरु असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.