अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने याआधी अनोखे आंदोलने करण्यात आली आहे.
दरम्यान आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सुमित वर्मा यांनी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांना पुन्हा एकदा खड्ड्यांच्या संदर्भात निवेदन दिले आहे. मागील दोन ते तीन महिन्यांपासून अहमदनगर शहरातील नागरिक खड्ड्यांचा समस्येमुळे त्रस्त झाले आहेत.
याबाबत अहमदनगर शहरातील राजकीय , सामाजिक संघटनांनी वारंवार आंदोलने केली. त्याचबरोबर महापालिकेला निवेदनं, विनंती अर्ज दिले. मात्र , तरीदेखील खड्ड्यांचा प्रश्न जैसे थेच असल्याने नगरकरांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरम्यान नुकतंच मनपा आयुक्तांना देण्यात आलेल्या या निवेदनात सुमित वर्मा यांनी म्हटले आहे की,
येत्या गुरुवारी मी स्वतः माझी दुचाकी घेऊन महानगरपालिकेमध्ये येणार आहे आणि आपल्याला माझ्यासोबत दुचाकीवर घेऊन खड्ड्यांचा आढावा घेण्यासंदर्भात विनंती वजा मागणी करणार आहे. आपण चारचाकी एसी कारमधून नगर शहरातील खड्ड्यांचा आढावा घेणे म्हणजे नगरकरांची थट्टा केल्यासारखे आहे,
त्यामुळे तसे न करता आपण दुचाकीवर आमच्यासोबत येऊन खड्ड्यांचा आढावा घ्यावा अशी आमची विनंती आहे , असं सुमित वर्मा यांनी आयुक्त शंकर गोरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान येत्या काळात खड्ड्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अन्यथा आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा सुमित वर्मा यांनी दिला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम