अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :- दिवाळीपूर्वी ऊस उत्पादक शेतकर्यांना अशोक सहकारी साखर कारखान्याने सेकंड पेमेंट न केल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात साजरी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याचा निषेध म्हणून दिवाळीच्या दिवशी म्हणजेच उद्या दि. 4 नोव्हेंबर रोजी शेतकरी अशोक कारखान्याचे सूत्रधार माजी आ. भानुदास काशिनाथ मुरकुटेंच्या निवासस्थाना समोरील जागेत खर्डा-भाकर खाऊन निषेध करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

याबाबतचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जितेंद्र भोसले व सुरेश पाटील ताके यांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, अशोक कारखान्याने आजपर्यंत फक्त भूल थापा दिलेल्या आहेत.
आसवनी उभारणीच्यावेळी 200 रुपये प्रति टन सभासद शेतकर्यांना फायदा होईल तसेच इथेनॉल प्रकल्प उभारणीच्या वेळीही तसेच आश्वासन दिले होते.
परंतु अशोकने कधीही आसवनी, इथेनॉल तसेच सहवीज निर्मिती प्रकल्प नसलेल्या कारखान्यांपेक्षा जास्त दर दिलेला नाही. ज्या कारखान्यांकडे दारू आहे असेच कारखाने जास्त दर देऊ शकतात असे कारखान्याचे सूत्रधार सांगतात.
मग दारूचे उत्पादन नसलेला संगमनेर कारखाना जास्त दर कसा देऊ शकतो असा सवाल आता शेतकरी करू लागले आहेत. दरम्यान उद्या होणारे निषेध आंदोलन कायद्याच्या चौकटीत राहून तसेच कायदा व सुव्यवस्थेला धक्का पोहोचणार नाही याची काळजी घेऊन केले जाणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम