अहिल्यानगर : लेखक सचिन मोहन चोभे यांचा पहिला बालकथासंग्रह ‘टग्या-टिगीच्या करामती’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी (दि. १ जानेवारी २०२५) होत आहे. रुईखेल (ता. श्रीगोंदा) येथे सायंकाळी ६ वाजता पुस्तकाचे प्रकाशन होणार असल्याची माहिती कृषीरंग प्रकाशनचे संचालक विशाल विधाटे यांनी दिली.
याबद्दल अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, जिथे शिक्षण झाले आणि वाचायला व समाजाकडे सकारात्मक पद्धतीने पाहण्याची दृष्टी मिळाली अशा रुईखेल या गावातच पुस्तकाचे प्रकाशन व्हावे अशी लेखकांची इच्छा आहे. त्यामुळे ग्रामीण संस्कृतीशी असलेली नाळ कायम ठेवत सदर कार्यक्रम रुईखेल येथील शेळके वस्ती येथे होत आहे.
लेखकांचे शिक्षक आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक गुलाब मांगडे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे मराठी विभागातील प्रा. डॉ. महेबूब सय्यद असतील,
तर यावेळी कीर्तनकार हभप सिद्धनाथ मेटे महाराज, उद्योजक महादेव गवळी, गेना शेळके, सुनील झगडे, शिक्षक शशिकांत मांगडे, विश्वनाथ महांडुळे आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रकाशकांनी दिली आहे.