अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- कोरानाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दहापेक्षा जास्त ॲक्टीव्ह कोरोना रुग्णसंख्या असणाऱ्या जिल्ह्यातील ६१ गावांच्या सीमा बंद केल्या आहेत.
या गावातील आगमन, प्रस्थान आणि आवश्यक बाबी वगळता इतर सर्व व्यवहार, समारंभास पूर्णत: मनाई करण्यात आली आहे. सोमवार दि.४ पासून दि. १३ ऑक्टोबरपर्यंत या ६१ गावात टाळेबंदी राहाणार असून आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क असून जिल्हाधिकारी डॉ.भोसले कोरोनाविषयक स्थितीचा दैनंदीन आढावा घेत आहेत. खबरदारीच्या उपाययोजनांचा अवलंब करण्याबाबत नागरीकांना आवाहन केले जात आहे. तिसऱ्या लाटेसंदर्भात दक्षतेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
अधिक रूग्णसंख्या असणाऱ्या गावांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. आता खबरदारीचा उपाय म्हणून दहापेक्षा जास्त ॲक्टीव्ह रुग्णसंख्या असणाऱ्या गावात व्यवहारावर बंधने घालण्यात आली आहेत. जामखेड, राहुरी, नगर तालुका वगळता जिल्हयातील इतर ११ तालुक्यातील ६१ गावांचा यात समावेश आहे.
संगमनेरमधील तब्बल २४ गावे बंद होणार असून, त्या खालोखाल श्रीगोंदा ९, राहाता ७, पारनेर ६, शेवगाव ४, अकोले, श्रीरामपूर प्रत्येकी ३, कर्जत २ आणि कोपरगाव, नेवासा व पाथर्डी तालुक्यातील एका गावाचा यात समावेश आहे. अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून किराणा दुकाने सकाळी ८ ते ११ या वेळत सुरू राहातील.
कृषी कामास, दुध संकलनास कोरोना नियमांची दक्षता घेत मुभा आहे. सदर गावातील शाळा, प्रार्थनास्थळे पूर्णत: बंद राहणार आहेत. तसेच लग्न, मेळावे, समारंभास पूर्णत: मनाई करण्यात आली आहे.
- हमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम