Ahmednagar News : सध्या राज्यात तलाठी भरती प्रक्रियेवरून वादळ उठले आहे. ठिकठिकाणी विद्यार्थी आंदोलने करत आहेत. काही जण या भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाला, घोटाळा झाला असे आरोप करत आहेत. काही ठिकाणी गुणवत्ता यादीत मार्कांची हेराफेरी झाली असेही काही लोक म्हणत आहेत. त्यामुळे ही भरती प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी काही विद्यार्थी करत आहेत. दरम्यान या बाबत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी पत्रकारांना याचे उत्तर दिले. ही भरती प्रक्रिया पारदर्शक झाली असून यामध्ये कुठलाही बदल किंवा रद्द ती केली जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट सांगितले.
काय म्हणाले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

राज्यात तलाठी भरती प्रक्रियेवरून विद्यार्थी रस्त्यावर उतरत आहेत. ही भरती प्रक्रिया रद्द करणार का असा सवाल त्यांना विचारण्यात आले होते. यावर उत्तर देताना ते म्हणाले, तलाठी भारती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली आहे. यामध्ये कसलाही घोटाळा, गैरप्रकार झालेला नाही. राजकीय लोकांनाही काही गोष्टींचे भान ठेवावे, त्यांनी विद्यार्थ्यांचा बुद्धिभ्रंश करू नये. निकाल वेबसाईटवर गेलेलाच असेल. त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत त्यांना संधी मिळेल. त्यामुळे भरती प्रक्रिया रद्द करण्याचा सवालच येत नाही असे ते म्हणाले आहेत.
गैरप्रकार नाहीच
तलाठी भरती प्रक्रियेत गैर प्रकार झाल्याचा आरोप त्यांनी फेटाळूनच लावला. यामध्ये कसलाही गैरप्रकार झालेला नाही. सर्व प्रक्रिया पारदर्शी पार पडलेली आहे. ही भरती प्रक्रिया रद्द करण्याचा विचार चुकीचा आहे. चुकीच्या पद्धतीने बातम्या पेरल्या जात आहेत. त्यामुळे ज्यांना मार्क आहेत त्यांना संधी मिळेल त्यांच्यावर अन्याय होणार नाही असे मंत्री विखे पाटील म्हणाले.