अहिल्यानगर : अहिल्यानगर ते पुणे दरम्यान झपाटयाने वाढत असलेल्या औद्योगिकरणाच्या पार्श्वभूमीवर नगर-पुणे दरम्यान रेल्वे सेवा सुरू करण्यासंदर्भात खासदार नीलेश लंके यांनी रेल्वे बोर्डाचे चेअरमन सतीशकुमार यांच्याकडे आग्रह धरला.
दरम्यान, औद्योगीकरण म्हणजे विकास असे सांगत सतीशकुमार यांनी या मार्गासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही खा. लंके यांना दिली. चेअरमन सतीशकुमार यांच्यासोबत झालेल्या बैठकीदरम्यान खासदार नीलेश लंके यांनी सुपा औद्योगिक क्षेत्रात आधुनिक रेल्वे स्टेशन तसेच मालधक्का हवा ही मागणी करतानाच सुपा-पारनेर हे औद्योगिक क्षेत्र हे महाराष्ट्रातील एक प्रमुख इंडस्ट्रिलयल हब म्हणून उदयास आलेले आहे.

उद्योगांची संख्या मोठया प्रमाणावर
विविध राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय उद्योग या वसाहतीमध्ये असून भविष्यात उद्योगांची संख्या मोठया प्रमाणावर वाढणार आहे. या गोष्टींचा विचार करून उद्योगांसह कृषि मालवाहू सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भातील बाबींकडे खा. लंके यांनी सतीशकुमार यांचे लक्ष वेधले.
विस्तार वाढणार
सुपा-पारनेर औद्योगिक क्षेत्राचा विस्तार हा ॲटोमोबाईल, फार्मा, स्टील, फुड प्रोसेसिंग, तसेच टेक्सटाईल उद्योग व एम एस एम एम आदी क्षेत्रातील उद्योग या वसाहतीमध्ये मोठया प्रमाणावर गुंतवणूक करत असल्याने या वसाहतीचा विस्तार वाढणार असल्याचे खा. लंके यांनी सतीशकुमार यांच्या निदर्शनास आणून दिले.
सुपा येथे विविध सुविधा हव्यात
मालवाहतूकीच्या सुविधेबरोबरच कृषि उत्पादने, प्रवासी उत्पादनासाठी या रेल्वेमार्गाचा विकास होणे महत्वाचे आहे. औद्योगिक क्षेत्रात हजारो कर्मचारी, उद्योजक, व्यापारी दररोज नगर ते पुणे प्रवास करतात. त्यासाठी सुपे येथे रेल्वे प्लॅटफॉर्म, प्रतिक्षालय,पार्किंग व्यवस्था, डिजिटल तिकीट प्रणाली या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी खा. लंके यांनी यावेळी केली.
वैश्विक बाजारपेठेत प्रवेश मिळणार
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसोबत असलेली कनेक्टिव्हिटीचा विचार करता सुपा-पारनेर औद्योगिक क्षेत्र हे पुणे, चाकण, मुंबई, दिल्ली, अहमदाबाद तसेच चेन्नई सारख्या प्रमुख औद्योगिक केंद्रांना जोडले जाऊ शकते. या वसाहतीमधील मोठे उद्योग हे वैश्विक बाजारपेठेत प्रवेश मिळवून आयात व निर्यात करणे सोपे होणार असल्याचेही यावेळी खा. लंके यांनी सांगितले.
वांबोरीत ओव्हरब्रिज हवा
राष्ट्रीय महामार्ग क्र.१६० असलेला नगर-मनमाडसोबत जोडलेल्या वांबोरी रेल्वे स्टेशन येथील रेल्वे गेटवर नागरीकांना जाण्या-येण्याच्या समस्या निर्माण होत आहेत. तासनतास प्रतिक्षा करणाऱ्या प्रवाशांना दिलास देण्यासाठी वांबोरी येथे ओव्हरब्रिज करण्याची मागणी यावेळी खा. लंके यांनी केली. नगर-पुणे रेल्वेमार्गासंदर्भात रेल्वे बोर्डाचे चेअरमन सतीशकुमार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत खासदार नीलेश लंके आपली भूमिका मांडली.