Ahmadnagar News : लोकसभेच्या आचारसंहितेत लटकलेल्या शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांसाठी हालचालींना वेग आला आहे. या वर्षी जिल्ह्यांतर्गत बदलीसाठी ३८०० पेक्षा जास्त शिक्षकांनी अर्ज केले आहेत, तर रिक्त जागा मात्र ४५० आहेत.
मात्र, तत्पूर्वी बाहेरच्या जिल्ह्यातून आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना जिल्हा परिषदेने स्वः तालुक्यासाठी प्राधान्य देण्याचे निर्देश आहेत. आंतरजिल्हा बदलीने आलेल्या १२५ शिक्षकांना या रिक्त जागांवर तालुका समानीकरणानुसार नेमणुका दिल्या जाणार आहेत.

शासनाने सुधारित आदेश काढून शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईनच करण्याचे फर्मान सोडलेले आहे. मात्र या आदेशात ऑनलाईन बदल्या नेमक्या या वर्षी की पुढच्या वर्षीपासून कराव्यात, याचा स्पष्ट उल्लेख नसल्याने काही ठिकणी शिक्षकांच्या मागणीनुसार ऑफलाईन बदल्यांची प्रक्रिया पार पडल्याचे सांगितले जाते.
त्यामुळे नगर जिल्हा परिषदेमधूनही ऑफलाईन बदल्या व्हाव्यात, अशी मागणी होती. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षक बदल्यांबाबत धोरण स्पष्ट केलेले नसले तरी हालचाली मात्र सुरू आहेत. यंदा ३८०० शिक्षकांना बदली हवी आहे. त्यांनी तसे अर्ज केले आहेत. मात्र रिक्त जागा ४५० आहेत.
अर्जदारामधील काही गुरुजींची शाळा घरापासून सात कि.मी. आहे, त्यांना आता पाच कि. मी वरील शाळा हवी आहे. याशिवाय संवर्ग एकमधून लाभासाठी पुन्हा एकदा दिव्यांग, घटस्फोटीतांचा विषय ऐरणीवर येणार आहेच.
असे असताना आंतरजिल्हापूर्वी जिल्ह्यांतर्गत बदल्या कराव्यात, अशी काही दिवसांपासूनची मागणी होती. मात्र त्यात यश आलेले नाही.
यापूर्वीच पवित्र पोर्टलवर आलेल्या १२० गुरुजींना नियुक्त्या दिल्या, आता आंतरजिल्ह्याने आलेल्या १२५ शिक्षकांनाही सीईओ आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील हे नियुक्त्या देणार आहे.
त्यामुळे आंतरजिल्हा झाल्यावरच जिल्ह्यांतर्गत बदल्या होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर पवित्र पोर्टलवरून नव्याने आलेल्या २० शिक्षकांना जिल्हा बदल्यानंतर नियुक्त्या देण्यात येणार आहे.