Ahmednagar News : अवैध वाळू वाहतूकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या येथील तहसीलदार संदीप भोसले यांना वाळू तस्कर व त्याच्या दोन साथीदारांनी शिवीगाळ करून आमचा टेम्पो लगेच सोडून द्या, नाहीतर तुम्हाला येथे नोकरी करू देणार नाही, अशी धमकी दिली. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी तालुक्यातील धोत्रे येथील तलाठी गणेश दिलीप वाघ (वय ३९) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाबासाहेब शिवाजी जाधव (रा. शिंगणापूर, ता. कोपरगाव), अझर इस्माउद्दिन शेख, तुषार दिपक दळे (रा. कोपरगाव) याच्या विरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. २३) रात्री साडेदहा ते साडेअकरा वाजेच्या सुमारास आरोपीचा टेम्पो तलाठी गणेश वाघ यांना कुंभारी फॉरेस्टमधून रोडला हिंगणीकडे जाताना एक टाटा कंपनीचा टॅम्पोमध्ये वाळु भरून जाताना दिसला.
तेव्हा टेम्पोला आडवून त्यावरील चालकाला त्यांनी त्याची ओळख सांगून त्याचे नाव, गाव विचारले असता, त्याने बाबासाहेब शिवाजी जाधव (रा. शिंगणापूर, कोपरगाव), असे त्याचे नाव सांगितले.
त्याच्याकडे वाळू वाहतूकीचा कोणताही परवाना नसल्याबाबत त्याने सांगितले असता, त्यांनी टेम्पो त्यावरील चालकासह रात्री ११.३० वाजेच्या सुमारास येथील तहसील कार्यालयात कारवाईसाठी आणला. त्या ठिकाणी टेम्पो चालकाने साथीदार अझर शेख (रा. गांधीनगर, कोपरगाव) व तुषार दिपक दळे (रा. कोपरगाव) यांना याठिकाणी फोन करून बोलावून घेतले.
तेव्हा तुम्ही आमचा वाळू वाहतूक करणार टेम्पो तहसील कार्यालयात का आणला. टेम्पो लगेच सोडून द्या, नाहीतर तुम्हाला येथे नोकरी करू देणार नाही, अशी धमकी देवून वरील तिन्ही लोकांनी फिर्यादीस धक्काबुक्की व मारहाण केली व शासकीय कामात अडथळा आणला.
त्यामुळे तलाठी गणेश वाघ यांनी तहसीलदार संदीप भोसले यांना फोनवरून बोलून घेतल्यानंतर तहसीलदार भोसले त्या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी त्यांनाही आमचा टेम्पो लगेच सोडून द्या, नाहीतर तुम्हाला नोकरी करून देणार नाही, अशी धमकी दिली.
याप्रकरणी तलाठी गणेश वाघ यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असून पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल वांढेकर पुढील तपास करीत आहेत.













