अहिल्यानगरमध्ये रामनवमी मिरवणुकीत आक्षेपार्ह घोषणेमुळे तणाव, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत शांततेत पार पाडली मिरवणूक

रामनवमी मिरवणुकीदरम्यान आक्षेपार्ह घोषणांमुळे पंचपीर चावडी येथे तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत डीजे बंद केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. आयोजकांनी शांततेचं आवाहन केल्याने मिरवणूक पारंपरिक मार्गाने शांततेत पार पडली.

Published on -

Ahilyanagar News : अहिल्यानगर शहरात रविवारी सायंकाळी पार पडलेल्या रामनवमी मिरवणुकीत आक्षेपार्ह घोषणेने काहीवेळ तणाव निर्माण झाला. पंचपीर चावडी भागात डीजेवरून दिल्या गेलेल्या घोषणेमुळे गर्दीतील वातावरण तापले. परंतु पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करत डीजे थांबवला आणि मिरवणुकीला थोडा वेळ थांबवून पुन्हा मार्गी लावले. आयोजकांनीही सामंजस्य दाखवत पोलिसांच्या सूचनेनुसार मिरवणूक पुढे नेली.

मिरवणूक मार्गावरून वाद

मिरवणुकीच्या मार्गावरून आधीच वाद निर्माण झाला होता. हिंदुत्ववादी संघटनांनी पारंपरिक मार्गावर मिरवणूक नेण्याचा आग्रह धरला होता, तर पोलिसांनी काही भागांवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे उत्सुकता वाढली होती. या पार्श्वभूमीवर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मार्गावर पोलीस, राज्य राखीव दल तैनात होते.

पंचपीर चावडी येथे तणाव

सायंकाळी सहाच्या सुमारास मिरवणूक पंचपीर चावडी येथे पोहोचली असताना, डीजेवरून आक्षेपार्ह घोषणा करण्यात आली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत डीजे बंद केला आणि आयोजकांनी शांततेचं आवाहन करत वातावरण निवळलं. मिरवणूक पुढे बॉम्बे बेकरी, चांद सुल्ताना हायस्कूल मार्गे माणिक चौकात पोहोचली.

धार्मिक उत्साहात मिरवणूक

मिरवणुकीत महाकाल साधूंचं नृत्य, गाण्यांवर थिरकणारे तरुण, जयघोष, आणि रामभक्तांची उत्साही उपस्थिती लक्षवेधी ठरली. ‘अरे बोल बजरंग बली की जय’, ‘बन गया मंदिर राम का’ यासारख्या गाण्यांवर तरुणांचा जोरदार प्रतिसाद होता. हातात भगवे झेंडे, श्रीरामाचे फोटोज घेऊन अनेक तरुण सहभागी झाले होते.

महाकाल नृत्य आणि अफजलखान वधाचा देखावा

माणिक चौकात सादर करण्यात आलेल्या “अफजलखानाचा वध” या नाट्य देखाव्याने नागरिकांची विशेष गर्दी आकर्षित केली. एका ट्रॉलीवर गडाच्या भव्य प्रतिमेच्या पार्श्वभूमीवर हा देखावा सादर करण्यात आला. त्याचप्रमाणे महाकाल साधूंचं नृत्य मिरवणुकीचा मुख्य आकर्षण ठरलं.

मिरवणुकीत चार मंडळांचा सहभाग

यंदा मिरवणुकीत एकाही प्रमुख राजकीय नेत्याचा थेट सहभाग दिसून आला नाही. मात्र चार प्रमुख मंडळांनी सहभागी होत मिरवणुकीत उत्सवाचा रंग भरला. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सव शांततेत साजरा करण्यात मोलाचा वाटा उचलला. किरकोळ वादावादी वगळता संपूर्ण मिरवणूक शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe