राज्यात ४० हून अधिक ST कामगारांचे झालेले मृत्यू भयानक ! विखे पाटील म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :-  राज्यात ४० हून अधिक कामगारांचे झालेले मृत्यू भयानक आहेत, सरकारने कामगारांच्‍या मागण्‍या मान्‍य करण्‍याबाबत फार प्रतिष्‍ठेचा विषय न करता सकारात्‍मक भूमिका घ्यावी असे आवाहन माजी परिवहन मंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.

एसटी कामगारांच्या संपाबाबत आ.विखे पाटील यांनी माध्‍यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणावर जोरदार टिका केली.

मागील पंधरा दिवस एसटी कामगार संपूर्ण राज्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करीत असताना सरकारला मात्र त्यांच्याशी चर्चा करायला वेळ नाही. न्‍याय मिळत नसल्‍याने कामगारांच्‍या आत्‍महत्‍येच्‍या घटना रोज घडू लागल्‍या आहेत.

दिवसागणिक ही संख्‍या वाढत चालली असतानाही संपाबाबत सरकार जर काहीच निर्णय करणार नसेल तर हे अत्‍यंत दुर्दैवी आहे. सरकारला अजून किती कामगारांचे मृत्‍यु हवे आहेत असा संतप्‍त सवालही त्‍यांनी केला. ग्रामीण भागातील अर्थकारणाचा कणा म्हणून एसटीच्या सुविधेकडे पाहीले जाते.

परंतू या कामगारांच्या प्रश्नाकडेच महाविकास आघाडी सरकारला पाहायला वेळ नसल्याची खंत व्यक्त करतानाच, एसटी कामगारांच्या श्रमातून महामंडळाचा डोलारा उभा राहीला आहे हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विसरू नये असे ठणकावून सांगतानाच सरकारने कामगारांच्या प्रश्नाचा विषय जाणीवपूर्वक प्रतिष्ठेचा केला असल्याचा आरोप आ.विखे यांनी केला.

कामगारांना न्याय देण्याऐवजी सरकारने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणे योग्य नाही. कामगारांचे निलंबन करण्‍यात महाविकास आघाडी सरकारला कसले भूषण वाटते, कामगारांवर कारवाई करणे हा उपाय नाही त्यामुळे सरकारने एक पाऊल मागे येवून कामगारांच्या मागण्यांबाबत निर्णय करावा.

विनाकारण संप मोडण्याची, तोडण्याची भाषा करण्यापेक्षा कामगारांच्या मागण्या मान्य करून न्याय देण्याची भूमिका सरकारने घेण्याची मागणी आ.विखे पाटील यांनी केली.