संगमनेर: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी जोरदार तयारी करत आहे. यासाठी सक्षम आणि एकनिष्ठ पदाधिकाऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे संगमनेर तालुक्यातील सध्याची कार्यकारणी बरखास्त करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय फड यांनी दिली.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर हालचालींना वेग आला आहे.
गावागावात, वाड्या-वस्त्यांवर जाऊन पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवून निवडणुकीसाठी वातावरण तयार करण्याचं काम सुरू होणार आहे.
शिवसेना या निवडणुका पूर्ण ताकदीने लढणार आहे. ग्रामीण भागात शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. लोकांचे प्रश्न आणि अडचणी सोडवण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी तालुकाभर दौरा करून गावकऱ्यांशी थेट संवाद साधला जाणार आहे.
नवीन चेहरे आणि कार्यक्षम पदाधिकारी निवडण्यासाठी सध्याची तालुका कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. आता सर्व शिवसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून उमेदवारांची चाचपणी होणार आहे.
यासाठी लवकरच तालुक्याचा दौरा होईल आणि गट-गण स्तरावर बैठका घेतल्या जातील. विशेष म्हणजे, या निवडणुकीत महिलांना आणि युवकांना मोठ्या प्रमाणात संधी देण्याचा विचार आहे.
ग्रामीण भागातले निष्ठावान आणि कर्तबगार शिवसैनिकांशी बोलून पुढचं नियोजन ठरवलं जाणार आहे. त्यासाठी शिवसैनिकांनी आपल्या गावातून, गटातून आणि गणातून सक्षम उमेदवारांची नावं सुचवावीत, असं आवाहन करण्यात आलं आहे. गट आणि गणातील बैठकीत या संभाव्य उमेदवारांवर चर्चा होईल.
लवकरच नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर केली जाईल, असं तालुकाप्रमुख संजय फड यांनी सांगितलं.