‘त्या’ टोळीवर खंडणीचाही गुन्हा

Published on -

५ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : तपोवन रोडवरून वैभव शिवाजी नायकोडी (वय १९, रा. ढवणवस्ती, तपोवन रस्ता) याचे अपहरण करून त्याचा खून करणाऱ्या टोळीनेच आणखी एका १९ वर्षीय युवकाचे अपहरण करत त्याच्या आई-वडिलांकडे ५० हजार रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी भागाजी वाळुंज (वय १९, रा. सम्राटनगर, चेतना कॉलनी, नवनागापूर, एमआयडीसी ) याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन ८ जणांवर अपहरण, खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना २१ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी दरम्यान आठरे पाटील शाळेजवळ घडली होती. याबाबत भागाजी वाळुंज (वय १९, रा. सम्राटनगर, चेतना कॉलनी, नवनागापूर, एमआयडीसी) याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे, अनिकेत उर्फ लपका सोमवंशी, नितीन नन्नवरे, महेश पाटील, करण सुंदर शिंदे, विशाल कापरे, रोहित गोसावी, सोनू घोडके (सर्व राहणार अ.नगर) यांनी भागाजी वाळुंज याच्या आई-वडिलांना धमकावून भागाजी यास घरुन घेऊन गेले आणि त्याला लपकाच्या गरवारे चौक येथील टपरीजवळ मारहाण केली

तसेच त्यांनी त्यास आठरे पाटील शाळेच्या मागे, गोल्डन सिटी जवळ नेऊन काठ्या, प्लास्टिकचे पाईप, बेल्ट व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यांनी भागाजी यास रात्रभर वेगवेगळ्या पद्धतीने मारहाण केली. गोल्डन सिटी येथील रोडच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या चेंबरमध्ये घालून तसेच त्याचे सर्व कपडे काढून त्यास नग्न करून मारहाण करून त्रास दिला.

त्यानंतर चेतना कॉलनीतील एका प्लॉटवर नेऊन डांबून ठेवले. त्याला जिवंत सोडण्यासाठी घरून ५० हजार रुपये आण अशी मागणी केली.तसेच २२ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० ते २३ फेब्रुवारी रोजीच्या पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास त्याला पुन्हा सर्वांनी मारहाण केली. त्यावेळी झालेल्या मारहाणीत वैभव नायकोडी याचा खून केल्याचे कोणास सांगू नये म्हणून त्यास चेतना कॉलनी येथील प्लॉटवर दोन दिवस डांबून ठेवले, असे भागाजी वाळुंज याने फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी अनिकेत उर्फ लपका सोमवंशी, नितीन नन्नवरे, महेश पाटील, करण सुंदर शिंदे, विशाल कापरे, रोहित गोसावी, सोनू घोडके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक मोढे हे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe