केंद्रीय वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांनी बोधेगाव (ता. शेवगाव) मार्गे गेलेल्या पैठण-पंढरपूर पालखी मार्गाचे दिवाळीत काम पूर्ण करण्याचा शब्द दिला होता. परंतु तो हवेत विरला असुन, अजुनही तो भूसंपादनाच्या सावळ्यागोंधळात अडकलेला पहायला मिळत आहे.
आषाढी एकादशीकरिता विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील संतांच्या ज्या मानाच्या पालख्या जातात, त्या पालख्यातील वारकऱ्यांची पायवाट सुकर व्हावी यासाठी केंद्रीय वाहतुक मंत्री नितिन गडकरी यांनी विशेष रस्ते देत त्यातील काहीना राष्ट्रिय महामार्गाचा दर्जा देत त्यांना मंजुरी दिली.
त्यातील पैठण येथील शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या पंढरपुरला जाणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी त्यांनी मंजुरी दिली याचे कामही सुरु झाले परंतु सहा वर्षाचा कालावधी लोटून देखील भुसंपादनाबरोबर वेगवेगळ्या आडथळ्यामुळे हे काम ‘तु हो पुढं मी आलो’ अशा पद्धतीने चालु आहे.
पैठण-पंढरपूर या दोन तीर्थक्षेत्रांना जोडणारा ७५२-ई हा पालखी मार्ग शेवगाव तालुक्यातील बोधेगावसह मुंगी, हातगाव, लाडजळगाव, शेकटे या गावातुन जातो. या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम उपविभाग शेवगाव यांच्याकडील पत्रानुसार याची रुंदी १० मीटर असतांना देखील महामार्ग व्यवस्थापनांकडुन मात्र काही ठिकाणी २४ तर काही ठिकाणी ३० मीटर आखून जमिनींचा मोबदला नं देता काम उरकण्यात आले आहे.
अन्याय होत असलेल्या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी काम बंद पाडुन मोबदला देण्याची मागणी केली. आत्तापर्यंत वेगवेगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे राहते घर, जनावरांचा गोठा, विहीर, जुनी झाडे, फळबाग, बोअरवेलसह पाईप लाईनचा सर्व्हे केला असुन अजुनही त्यावर कार्यवाही चालु असल्याचे सांगण्यात येत आहे.
पैठण पंढरपुर रस्त्यासंदर्भात रस्तारोको तसेच जिल्हाधिकारी यांना वेळोवेळी शेतकऱ्यासमवेत डॉ. क्षितिज घुले यांनी निवेदन देउन काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले परंतु जमिन भुसंपादनाच्या भिजते घोंगड्यामुळे याचा प्रश्न प्रलंबित आहे
महामार्गाच्या कामासाठी आमचा विरोध नाही. मात्र महामार्गालगत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या होणाऱ्या मालमतेची शासनाने नुकसान भरपाई द्यावी. – संगिताताई ढवळे (महिला तालुकाध्यक्ष वंचित बहुजन, शेवगाव)
शेवगाव तालुक्यात बहुतांशी ठिकाणी पैठण- पंढरपुर या रस्त्याची कामे पूर्ण झाली असुन मुंगी, शेकटे आणि काही बोधेगाव भागात ती अपूर्ण आहेत. सध्या भुसपंदाचे काम अंतिम टप्प्यात असुन त्याचा निवाडा या डिसेंबर अखेरपर्यंत मार्गी लागल्यास सदरील कामास गती मिळणार आहे. प्रसाद मते प्रांताधिकारी शेवगाव, पाथर्डी